शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

भगवान बुद्ध (भाग - १ : जन्मापासुन संबोधीप्राप्ती पर्यंत)

१. ख्रिस्तपुर्व सहाव्या शतकात भारत हा एकसंघ राष्ट्र नव्हता, तो विविध राज्यांमध्ये विभागला होता, त्यांना सोळा महाजनपदे असे म्हणतात.


२. त्यावेळेस शुद्धोधन हा कपिलवस्तुचा राजा होता परंतु कपिलवस्तुवर त्याची सत्ता चालत नव्हती कारण कपिलवस्तुची शासन पद्धती हि गणराज्य पद्धतीची होती.


३. राजा शुद्धोधनाला दोन बायका होत्या. १. महामाया आणि २. महाप्रजापती. महाप्रजापती हि राजाची दुसरी पत्नी असली तरी ती महामायेची मोठी बहीण होती.


४. महामायेने दहा महिने पोटात वाढविल्यानंतर सिद्धार्थाला जन्म दिला, आणि सात दिवसांनीच महामायेचे निधन झाले. त्यानंतर सिद्धार्थाचे पालन पोषण त्याची मावशी महाप्रजापतीने केले.


५. तत्पुर्वी असीत नावाच्या ॠषीने सिद्धार्थाबद्दल भविष्यवाणी केली होती कि हा बालक बुद्ध बनणार..


६. सिद्धार्थाला नंद नावाचा लहान भाऊ होता, नंद हा महाप्रजापतीचा मुलगा होता. याशिवाय सिद्धार्थाला अनेक चुलत भाऊ होते. त्यामध्ये अनुरुद्ध, महानाम, आनंद. तर देवदत्त हा त्याचा आत्येभाऊ होता.


७. वयाच्या आठव्या वर्षापासुन सिद्धार्थाच्या शिक्षणाला सुरुवात झाली. सर्वमित्र हा त्याचा दुसरा गुरू होता. याशिवाय भारद्वाज जो आलारकालामाचा शिष्य होता त्याने सिद्धार्थाला ध्यान साधनेचे शिक्षण दिले.


८. जेव्हा केव्हा सिद्धार्थ आपल्या पित्यासोबत शेतावर जायचा त्यावेळेस तो समाधी अवस्थेत बसायचा.


९. शुद्धोधनाने सिद्धार्थाला बौद्धिक विकासाच्या, क्षत्रीयत्वाच्या सर्व प्रकारचे शिक्षण दिले, सिद्धार्थाच्या अंतकरणात करुणा होती, माणसाला त्रास द्यायला त्याला आवडत नसेल.


१०. वयाच्या सोळाव्या वर्षी यशोधरा हिच्याशी सिद्धार्थाचे लग्न झाले, आणि त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले.


११. वयाच्या वीसव्या वर्षी सिद्धार्थाने शाक्य संघाची दीक्षा घेतली. संघाचा तो एकनिष्ठ सभासद होता. तो संघाचा सभासद झाल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी अशी घटना घडली ज्याने त्याचे आयुष्यच बदलुन गेले. शाक्य राज्याच्या सिमेला कोलीय राज्य होते आणि रोहीणी नदीने त्यांची सीमा निश्चित केली होती आणि या नदीच्या पाण्यावरुन दोन राज्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. आणि शाक्यसंघाने कोलीयांविरुद्ध युद्ध पुकारले, परंतु सिद्धार्थाने मात्र याला विरोध केला.


१२. यावर शिक्षा म्हणुन शाक्य संघाने सिद्धार्थापुढे तीनपैकी एक मार्ग निवडण्याचे सांगीतले. १. युद्धात सामील होणे, २
. देहांत किंवा देशत्याग ३. कुटुंबावर सामाजीक बहिष्कार. यापैकी सिद्धार्थ दुसरा पर्याय निवडतो. आणि देशत्यागाची तयारी करतो. आणि सर्वांचा निरोप घेऊन परिव्राजक होण्यासाठी घरातुन बाहेर पडतो. स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर न झुकवता स्वेच्छेने शिक्षा पत्करणारा तो शाक्य युवक होता...


१३. आपल्या बायको, मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता असा आरोप अनेक अज्ञानी करत असतात परंतु त्यांनी हि गोष्ट ध्यानात ठेवावी कि,, सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते...


१४. गृहत्यागानंतर सिद्धार्थ सर्वप्रथम बिंबीसार राजाची राजधानी राजगृहाकडे जातो. राजगृह कपिलवस्तुपासुन सुमारे चारशे मैल अंतरावर आहे. हा दीर्घ प्रवास सिद्धार्थाने पायीच केला. तेथे त्याची बिंबीसार राजाशी भेट झाली.


१५. त्यानंतर त्याची भेट पाच परिव्राजकांसोबत त्यांची नावे पुढीलप्रमाणे : कौण्डिण्य, अश्वजीत, कश्यप, महानाम, भद्रिक. सिद्धार्थाचे रुप पाहुन ते थक्क झाले.


१६. इकडे कपिलवस्तुमध्ये सिद्धार्थाच्या गृहत्यागाचे पडसाद उमटु लागले. जनता निदर्शने करु लागली, परिणामी शाक्य संघाला परत सभा बोलावुन शांततेची घोषणा करावी लागली. हि गोष्ट सिद्धार्थाला त्या परिव्राजकांकडुन समजली.


१७. आलारकालाम यांची भेट घेण्यासाठी सिद्धार्थाने राजगृह सोडले, वाटेत तो भृगु ॠषींच्या आश्रमात थांबला. तेथे काही काळ थांबल्यानंतर तो आलारकालामच्या निवासाकडे निघाला. आलारकालाम त्यावेळेस वैशालीला राहायचा.


१८. आलारकालामाकडुन सिद्धार्थाने सांख्य तत्त्वज्ञाची तत्त्वे शिकुन घेतली. आलारकालामांनी केलेल्या विवरणामुळे सिद्धार्त गौतम आनंदित झाला.


१९. आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या सिद्धार्थाला ध्यानमार्गाची (समाधी) माहीती घ्यावी असे त्याला वाटले. आलारकालामांनी सिद्धार्थाला ध्यानमार्गाचे तंत्र शिकविले. त्याच्या एकुण सात सिद्धी होत्या.


२०. या ध्यानमार्गाच्या तंत्रानंतर आलारकालामाकडे सिद्धार्थाला शिकविण्यासाठी काहीच नव्हते म्हणुन सिद्धार्थ आलारकालामाचा निरोप घेऊन तिथुन निघुन गेला.


२१. त्याच्यानंतर तो उद्दकरामपुत्र याच्याकडे गेला, उद्दकरामपुत्र हा कोशल राष्ट्रामध्ये समाधीमार्गासाठी प्रसीद्ध होता. उद्दकरामपुत्राने आलारकालामापेक्षा समाधीमार्गातील वरची पायरी शिकवली.


२२. त्यानंतर सिद्धार्थ उरुवेला येथे गेला. उरुवेला म्हणजेच आत्ताचे बुद्ध गया शहर. उरुवेला येथे वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी तो एका ॠषीच्या आश्रमात गेला.


२३. वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी त्याने निरंजना नदीजवळील एकांतातील स्थळ निवडले. राजगृहात भेटलेले ते पाच परिव्राजक, ज्यांनी सिद्धार्थाला शांततेची वार्ता सांगीतली होती. ते देखील वैराग्य मार्गाचा अभ्यास करत होते.


२४. त्यानंतर ते पाच परिव्राजक त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागत होते. आदरभावाने त्याची सेवा करत होते. सिद्धार्थाने वैराग्य मार्गाचा अभ्यास करायला सुरुवात केली.


२५. गौतमाने सुरु केलेली तपश्चर्या व त्यातुन होणारे आत्मक्लेश याचे स्वरुप अतिशय उग्र होते. दररोज तो फक्त एक वाटी अन्नावर जगत असे. कधी कधी तर पंधरवाड्यातुन एकदा अशा अन्नावर तो जगत होता. वैराग्याच्या निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करत तो शरीराला पराकाष्टेच्या यातना देत जगु लागला.


२६. घोर अरण्यात त्याने वस्ती केली होती. तो भाग कोणाच्या अंगाचा थरकाप उडेल इतका भयानक होता. हिवाळ्याच्या कडक थंडीत तो समाधी अवस्थेत न हलता राहायचा, कडक उन्हाळ्यात अंग भाजुन टाकणाऱ्या उन्हात तो राहत असे.


२७. काही दिवसानंतर तांदळाच्या किंवा तिळाच्या एका दाण्यावर तो जगु लागला. अशाप्रकारे आपल्या शरीराला अतिशय कष्ट देत तपश्चर्या करु लागला. त्यामुळे त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते. त्याचे शरीर म्हणजे हाडाचा सापळाच बनला होता. अशी हि तपश्चर्या सहा वर्षे चालली होती.


२८. या यातनांमुळे त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते, इतके कि त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीसुद्धा त्याला प्रकाशाची किरण दिसत नव्हती.


२९. त्यावेळी उरुवेला येथील सुजाता नावाच्या स्त्रीने वटवृक्षाला केलेला नवस फेडण्यासाठी ती वटवृक्षाजवळ जाण्यासाठी निघाली असता, वटवृक्षाखाली गौतमाला बसलेले बघुन जणु काही वृक्ष देवताच अवतरली असे तिला वाटले.


३०. सुजातेने त्याच्यासाठी खीर बनवली व ते सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीजवळ गेला, अंघोळ केली व खीर खाल्ली अशाप्रकारे सिद्धार्थाने वैराग्यमार्ग त्यागला.


३१. तपश्चर्या व आत्मक्लेश यांच्या केलेल्या त्यागामुळे ते पाच परिव्राजक गौतमाला सोडुन गेले.


३२. वैराग्य मार्गाचा त्याग केल्यावर गौतमाने जागा बदलवली तो पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन अवस्थेत बसला. वैशाख पोर्णीमेच्या रात्री बोधीसत्त्व बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रयत्न करतो हे पाहुन माराला अतिशय वाईट वाटले... आणि मार बोधीसत्त्वासोबत युद्ध करण्यासाठी आला. मारासोबत बोधीसत्त्वाचे झालेल्या युद्धाबद्दल वाचण्यासाठी लिंकवर जा...

बोधीसत्व आणि मारामधील युद्ध


३३. माराला युद्धामध्ये पराभुत केल्यावर, मनातील वाईट विचार काढुन टाकल्यावर गौतम पुन्हा ध्यानमग्न अवस्थेत बसला. आणि गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती साठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायऱ्यांनी त्याने संपुर्ण ज्ञानाची प्राप्ती करुन घेतली. आणि बोधीसत्त्व सम्यक संबुद्ध बनला...


क्रमशः

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

रविवार, २२ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे (भाग २ : राजा प्रसेनजीत आणि भगवान बुद्ध - २)

मागील प्रकरण वाचण्यासाठी क्लिक करा....



राजा अजातशत्रु आणि प्रसेनजीतमधील युद्ध


मागील लेखामध्ये सांगीतल्याप्रमाणे अजातशत्रु हा प्रसेनजीतचा भाचा होता. अजातशत्रु हा देवदत्ताचा प्रभावाखाली होता, आणि अजातशत्रुचा पिता राजा बिंबीसार हा बुद्धाचा उपासक असल्यामुळे देवदत्ताने अजातशत्रुचे कान भरले व अजातशत्रुने बिंबीसाराला बंदी बनवले तिथेच त्याचे निधम झाले हि बातमी कळताच बिंबीसाराची पत्नी व प्रसेनजीतची बहीण हिनेसुद्धा प्राण सोडले. पुढे अजातशत्रुने प्रसेनजीत विरुद्ध दोघांचेही युद्ध सुरु झाले आणि प्रसेनजीतचा पराभव झाला आणि तो आपली राजधानी श्रावस्ती येथे परतला. हे वर्तमान भगवंतांना कळताच भगवान म्हणाले,,



भिक्खुहो, मगध राजा अजातशत्रु म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे, याउलट राजा प्रसेनजीत हा जगातील चांगुलपणाचा मित्र. सध्यातरी प्रसेनजीतला पराभुत मनुष्य म्हणुन दुःखामध्ये रात्र काढावी लागणार आहे.





• विजयातुन द्वेष जन्मास येतो., जिंकणाऱ्याला दुःखात काळ कंठावा लागतो.

• परंतु जो शांत व क्रोधविरहीत आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसाच्या गावी जय पराजयाची वार्ताच नसते...




आपला पराभव लक्षात ठेऊन प्रसेनजीतने अजातशत्रुवर स्वारी केली आणि त्याचा पराभव करुन त्याला जीवंत पकडले, तेव्हा प्रसेनजीतने स्वतःशीच विचार केला कि, मी याच्या वाटेला गेलो नव्हतो, हा माझा नातेवाएक असुनसुद्धा मला त्रास देतो, आता मी याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ आदि ताब्यात घेऊन त्याला सोडुन दिले तर ..? आणि प्रसेनजीतने तसेच केले.


हे वर्तमान भगवंतांना कळताच भगवान म्हणाले,


• माणुस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांदा लुटण्याची इर्षा धरतो.


• हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणी तरी भेटतोच. जेत्याला कोणीतरी हरवतोच. निंदकाला निंदक सापडतो.

• अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्यांना लुटतो त्यावरही स्वतःला लुटल्या जाण्याची पाळी हि येतेच...


• पुढे प्रसेनजीतने आपली मुलगी वजीरा हिचे लग्न अजातशत्रुसोबत लावुन दिले. आणि त्याच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले...



मुलापेक्षा मुलगी बरी..!


एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनात राहत असताना कोसलराजा प्रसेनजीत धम्म जाणुन घेण्यासाठी भगवंतांजवळ आला. राजा भगवंतांसोबत बोलत असताना, राजवाड्यातुन एक दूत आला आणि राजाजवळ जाऊन त्याची राणी प्रसुत होऊन तिला मुलगी झाल्याचे त्याला कळले. हि बातमी ऐकुन राजा खुप दुःखी झाला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले असता प्रसेनजीत म्हणाला,, आत्ताच माझी पत्नी मल्लिका प्रसुत झाली, आणि मला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे कळले त्यामुळे मी दुःखी आहे.

यावर भगवंत म्हणाले,, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली आहे, ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी आणि माता अशा विविध भुमीका करणारी आहे. तिच्यापासुन अनेक बोधीसत्त्व आणि चक्रवती जन्म घेतात. त्यामुळे तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करेल, मोठे राज्य करेल. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल...



चार प्रकारचे मनुष्य


एकदा कोसलराजा प्रसेनजीतने भगवंतांना विचारले कि भगवान चार प्रकारचे मनुष्य कोणते..?


भगवान म्हणाले..


१. अंधारातुन अंधाराकडे जाणारा
२. अंधारातुन प्रकाशाकडे जाणारा
३. प्रकाशातुन अंधाराकडे जाणारा 
४. प्रकाशातुन प्रकाशाकडे जाणारा





१. हीन कुळामध्ये जन्मलेला मनुष्य जन्मभर दुष्कृत्ये करतो त्याला मी अंधारातुन अंधाराकडे जाणारा मनुष्य म्हणतो.


२. एखादा मनुष्य हीन कुळामध्ये जन्मतो, खाण्यापिण्याची त्याला टंचाई असते. परंतु काया, वाचा आणि मनाने तो सत्कर्म करतो अशा माणसाला मी अंधाराकडुन प्रकाशाकडे जाणारा म्हणतो.


३. तिसऱ्या प्रकारात एखादा थोर कुळात जन्मतो, त्याला खाण्यापिण्याची टंचाई नसते परंतु काया, वाचा आणि मनाने दुष्कर्म करतो, अशा माणसाला मी प्रकाशातुन अंधाराकडे जाणारा म्हणतो.


४. जो चांगल्या कुळामध्ये जन्म घेतो आणि सर्वकाळ सदाचारी राहतो त्याला मी प्रकाशातुन प्रकाशाकडे जाणारा म्हणतो.






गेल्याचा शोक करणे व्यर्थच....



एकदा प्रसेनजीतची सर्वात आवडती राणी मल्लीका मरण पावली हि बातमी कळताच राजा खुप शोकाकुळ झाला.


हे वर्तमान भगवंतांना समजताच भगवान म्हणाले,, महाराज, जरा धर्मी पदार्थाला जरा येतोच. मरणधर्मी पदार्थाला मरण येतोच, व्याधीधर्मी पदार्थाला व्याधी येतेच., नाशधर्मी पदार्थाचा नाश हा अटळ आहे, त्याला त्याच्यापासुन कोणी अडवु शकणार नाही.


परंतु हे महाराज, अज्ञानी असा विचार करत नाही कि, माझ्याच प्रियजनांना व्याधी, मरण येत नाही, हा सर्व जगाचा धर्म आहे. अज्ञ मनुष्याला असा विचार करता येत नाही त्यामुळे तो शोकाकुळ होतो. त्याचे कामात लक्ष लागत नाही, त्याचे जेवन बरोबर होत नाही., त्यामुळे त्याचे शत्रु आनंदीत होतात. असा मुर्ख मनुष्य आपलीच हानी करुन घेतो परंतु अशावेळेस आर्यश्रावक निर्वाणमार्गाचा लाभ करुन घेतो.






शाक्यांद्वारे फसवणुक....


प्रसेनजीत राजा हा भगवान बुद्धांचा फार मोठा उपासक होता, त्यामुळे त्याने शाक्यकुळातील एखाद्या राजकन्ये सोबत लग्न करण्याची योजना आखली. परंतु शाक्यराजे कोसल राष्ट्राला आणि प्रसेनजीत राजाला नीच मानत होते, त्यामुळे आपली कन्या कोसल राजाला देणे हे शाक्यांना योग्य वाटत नव्हते. तथापि शाक्यांवर कोसल राजाचीच सत्ता असल्यामुळे ते प्रसेनजीत राजाच्या या मागणीला ते नाकारु शकत नव्हते. तेव्हा शाक्यांनी युक्ती केली कि, महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तीया हिला महानामाची स्वतःची कन्या म्हणुन प्रसेनजीतला द्यावी. नंतर कोसल राजा प्रसेनजीतच्या अमात्यांना महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तीया खुप आवडली. जेवनाच्या वेळेस महानाम हा वासभखत्तीयाच्या बाजुला बसल्यामुळे अमात्यांची अशी खात्री झाल्यामुळे त्यांनी कोसल राजा प्रसेनजीतचे लग्न ठरविले. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांचे लग्न झाले. आणि त्याला एक मुलगा झाला. तिचा मुलगा सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या आजोळी शाक्यांकडे गेला. शाक्यांनी त्याचे आपल्या नागमंदिरात योग्य सन्मान केला. परंतु तो तिथुन निघुन गेल्यावर त्याचे आसन धुतले गेले ; आणि आपण दासीपुत्र आहोत हि गोष्ट समजताच तो रागाने लालबुंद झाला. वयात आल्यावर त्याने जबरदस्तीने कोसल देशाचे राज्य बळकावले व वृद्ध प्रसेनजीतला राजवाड्यातुन हाकलुन लावले. त्यामुळे प्रसेनजीत आपला भाचा मगध राजा अजातशत्रुच्या आश्रयाला वेशांतर करुन जाण्यास निघाला परंतु राजगृहाच्या बाहेरील एका धर्मशाळेत तो मरण पावला......


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग २ : राजा प्रसेनजीत ~ १)

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग २ : राजा प्रसेनजीत ~ १)

प्रसेनजीत हा कोसल देशाचा राजा होता, कोसल हे राष्ट्र मगध देशाच्या उत्तरेला वसलेले होते, त्यावेळी बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. श्रावस्ती हे कोसल देशाच्या राजधानीचे शहर होते. बिंबीसार हा प्रसेनजीतच्या बहिणीचा नवरा होता, प्रसेनजीतची बहिण हि बिंबीसार राजाची मुख्य पत्नी होती. प्रसेनजीत हा वैदिक धर्माचा अनुयायी होता, तो खुप मोठे मोठे यज्ञ करायचा. तरीसुद्धा तो श्रमणांचा मान ठेवायचा. त्याच्या राजधानी मध्ये अनाथपिंडिक ज्याचे खरे नाव सुदत्त होते त्याने भगवान बुद्ध व भिक्षुसंघासाठी जेतवन नावाचा मोठा विहार बांधुन दिला, भगवान बुद्धांनी आपले उपदेश सर्वात जास्त उपदेश श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनातच केला.



प्रसेनजीतची धम्मदीक्षा...



एके समयी भगवान बुद्ध श्रावस्ती अनाथपिंडिकाच्या जेतवनात विहार करत होते, हे जेव्हा प्रसेनजीत राजाला समजले तेव्हा तो राजेशाही इतमामासह जेतवन विहारामध्ये गेला, आणि भगवंतांना हात जोडुन वंदन करीत तो म्हणाला,,

भगवान माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य आज खोरोखर भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा शिक्षक, धर्मराज उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील...? ज्या अर्थी आपल्या पवित्र चरणांचे मला दर्शन झाले त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करु द्या.

भगवान म्हणाले,, ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामन्य माणसालाही मनःशांती लाभते.


सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाची स्थीती ओळखुन भगवान म्हणाले,,


हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य बघितला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो ; मग राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल..? आणि म्हणुन मी माझा धम्म थोडक्यात सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपुर्वक ऐकावे व आत्मसात करावे.


• आपली बरी वाईट कृत्ये नेहमी सावलीप्रमाणे आपला पाठलाग करतात.

• सर्वात अधिक गरज करुणामय ह्रदयाची आहे.

• आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे समजा., त्यांच्यावर जुलुम करु नका.

• आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा.

• कुमार्मागाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा.

• दुसऱ्यांना पायदळी तुडवुन स्वतः उच्चपदी चढू नका.

• दुःखीताना सुख द्या आणि त्याला आपला मित्र बनवा.

• तोंडपुजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकु नका.

• तपश्चर्येने स्वतःला क्लेश करुन घेण्यात काहीही लाभ नसते, म्हणुन धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा.

• दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्यानेच त्यातुन आपली सुटका होऊ शकेल...

• सर्व शहाणे लोक शारीरीक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते काम-वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनांचा अवलंब करतात.

• झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहु शकतील..? जिथे वासना असते तिथे सत्य राहु शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही त्या मनुष्याची विद्वान म्हणुन कितीही त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे.

• ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करुन घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.

• हे सत्य केवळ ॠषींसाठीच नसुन प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. ॠषींचीही अधोगती होऊ शकते, आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ॠषीपदाला पोहोचु शकततात.

• कामवासनेच्या भरतीपासुन सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहुन जाते, जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणु. धम्म तुम्हाला असा आदेश देतो कि, तुमच्या या शत्रूंपासुन तुम्ही आपले संरक्षण करा.

• आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणुन आपण सत्कर्मेच करावीत.

• आपल्या हातुन दुष्कृत्ये होऊ नये म्हणुन बपण आपले विचार तपासुन पहावे, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते.

• प्रकाशातुन अंधाराकडे आणि अंधारातुन प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातुन दाट अंधाराकडे आणि संधि प्रकाशातुन उज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुद्य मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणुन तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करत राहील.

• सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करुन आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा.

• मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असु द्या. सद्वर्तनाच्या धर्म नियमांचे उल्लंघन करुन नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तुंवर अवलंबुन न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबुन ठेवा.


भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली, आणि तो भगवान बुद्धांचा उपासक झाला...


क्रमशः


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



बौद्ध धर्मानेच उत्कर्ष होणार आहे...

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

बौद्ध धर्मानेच उत्कर्ष होणार आहे... ( भाग १ : मुलभूत फरक)



आज जगात अनेक धर्म आहेत आणि त्या धर्माचे पाईक म्हणवणारेही अनेक आहेत, जवळपास जगातील प्रत्येक धर्म ईश्वराचे अस्तित्व मान्य करतो, एवढेच नव्हे तर आपण सांगीतलेला मार्ग हाच खराखुरा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. त्या धर्मांचा दुसरा पाया म्हणजे आत्मा. काही धर्म पुनर्जन्म मानतात तर काही धर्म एकच जन्म मानतात. आत्मा मानणारे धर्म म्हणतात,, तुम्ही मागील जन्मात केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला पुढील जन्मात मिळेल, आणि जेव्हा ईश्वर भक्तीमुळे तुमच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होईल आणि तुम्ही जन्मजन्मांतराच्या फेऱ्यांमधुन मुक्त व्हाल. तर काही धर्म सांगतात तुम्हाला एकच जन्म मिळेल आणि त्या जन्मात तुम्हाला आम्ही सांगीतलेल्या कथीत ईश्वराची भक्ती करावी लागेल तेव्हाच तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल, आणि आम्ही सांगीतलेल्या ईश्वराची भक्ती तुम्ही करणार नाही तर नरकात जाल. 



आता समजा पारशी धर्मानुसार झरत्रुष्ट नावाच्या ईश्वराने ह्या सृष्टीची निर्मीती केली, इस्लामनुसार अल्लाह आणि ख्रिस्ती धर्मानुसार यहोवा ने तर आता आपण यांच्यापैकी एक धर्म स्वीकारला तर त्याच्यानुसार आपण मेल्यानंतर स्वर्गात जाऊ शकतो परंतु बाकिच्या इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मानुसार तो त्यांच्या धर्माचा नसल्या कारणाने नरकातच जाणार. अशा या धर्मांचा सिद्धांत आहे, यामध्ये खरे काय नि खोटे काय हे मी जाणत नाही, कारण मी अरहंत नाही .....




असो,, पण बुद्धाचा धर्म मात्र निराळा आहे. माझ्या धर्मात आत्मा आणि ईश्वराला कसलेही आणि कोणतेही स्थान नाही. बुद्धाचा धर्म केवळ ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाकारतो यामुळेच निराळा नाही. जर तसे असते तर बाकिच्या निरिश्वरवादी धर्मांमध्ये, निरिश्वरवादी व अनात्मवादी असणाऱ्या लोकांमध्ये, धर्माला अफुची गोळी मानणाऱ्यां नास्तिकांमध्ये आणि बुद्धाच्या धर्मामध्ये फरक तो काय उरणार...?







बुद्धाचा धर्म : निरिश्वरवाद, अनात्मवाद आणि अनित्यवाद








भगवान बुद्धांचा धर्म हा निरिश्वरवादी आहे त्यात ईश्वराला आणि आत्म्याला स्थान नाही.





सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवा ती!




प्राणीमात्रांनी, मनुष्यांनी व देवांनी सुद्धा तथागतास भगवान म्हटले आहे. अशा शुद्ध-संयमी भगवान बुद्धाने पट्ठान मध्ये केला आहे. ती अत्यंत सखोलनयाने परिपुर्ण देशना आहे. अभिद्धम्मपिटकातील सातवा ग्रंथ पट्ठान ह्या ग्रंथाबद्दल बुद्धघोष म्हणतात..




"हीच ती महत्त्वपुर्ण बुद्ध तत्वज्ञानाची खरी कसोटी आहे ज्यामुळे नित्यावाद, नित्य, ध्रुव पदार्थाचे ग्वेषक ह्या नित्यवादाचा साथ सोडतात. कारण भगवान बुद्धाने आपल्या धम्मात ईश्वरासाठी कोणतेच आणि कुठलेच स्थान ठेवले नाही, आणि न आत्म्यासाठी, तरी तो पुनर्जन्म आणि कुशल, अकुशल कर्माच्या विपाकाला मानतो, ह्या मान्यतेच्या मुळात बुद्ध धम्माचा 'प्रतित्य समुत्पाद' धम्माचा मुख्य सिद्धांत आहे."





तथागताला ह्या सत्याचे ज्ञान सम्यक संबोधीप्राप्तीच्या वेळीच झाले होते. ह्याचे प्रमाण त्रिपिटकात बरेच आहे. 


कोणता आहे तो नियम, ज्याचे ज्ञा भगवंतांनी सम्यक संबोधी प्राप्तीच्या वेळी जाणुन घेतले?

प्रतित्य समुत्पाद हा तो सखोल आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे एकमेव सुत्र अहे. हा कोरा दार्शनिक सिद्धांत नाही. ही सम्यक सम्बुद्धाचे प्रत्यक्ष अनुभुती आहे. जर हा कोरा दार्शनिक सिद्धांतच असता तर तथागताला उपदेश करण्याची आवश्यका नव्हती. जर तसे असते तर तथागत सुद्धा अरस्तु, शेखर, नागार्जुन ह्यांच्याच समकोटीचे दार्शनिक असते. ते करूणेचे करूणाकार झाले नसते. त्यांच्या रूपाने मानवतेला आधार मिळाला आहे. खरोखरच तथागतांच्या करूणेचे ज्ञानमय परिणाम प्रतित्य समुत्पादच आहे.....


भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान वरती उंच शिखरावर जाऊन समता, समानता व बंधुत्व दर्शविते. निरिश्वरवाद, अनात्मवाद आणि अनित्यवाद हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे गाभा आहेत.....





भगवान बुद्ध हा साधासुधा मानवपुत्र असुन तो शेवटपर्यंत साधा मनुष्य राहिला व त्याने पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले, हे जगमान आहे, त्याने जन्मतः अलौकिक असण्याचा आव आणला नाही की अलौकिक चमत्कार करण्याची शक्ती आपल्या अंगी असल्याचे भासवुन जनतेला केव्हाही फसविले नाही,, बौद्ध धम्म हा वास्तववादी आहे. ईश्वरा आणि आत्मा यांच्यासारख्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाचा विश्वास नव्हता...





मनुष्य - मनुष्यांमधील संबंध जोडणारा धर्म...





जगातील बहुतेक धर्म ईश्वर व मनुष्य यांच्यातील संबंध जोडणारे आहेत. परंतु बुद्धाचा धर्म हा मानवा - मानवांमधील संबंध जोडणारा आहे, तुमचे वर्तन दुसऱ्या व्यक्तीसोबत कसे असायला हवे हेच बुद्धाचा धर्म शिकवतो....


बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व रामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील यात शंका नाही.







कोरा दार्शनिक सिद्धांत नव्हे... सर्वकाही अनुभवातुनच....





भगवान बुद्ध म्हणतात काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. बुद्धाच धर्म आत्मा आणि ईश्वर यांचे अस्तित्व नाकारतो, मग काही लोक म्हणतात कि, भगवान बुद्धाने जे आत्मा आणि ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे, ते त्याच्या अनुमानावरुन मग हा त्याचा काल्पनिक अनुमान ठरत नाही का..? जेव्हा जगातील सर्वच धर्म आत्मा व ईश्वराचे अस्तित्व नाकारतात आणि बुद्ध त्याचे अस्तित्व नाकारतात मग तो काल्पनिक अनुमान ठरत नाही का..? असे प्रश्न अनेक बौद्धोत्तर विचारत असतात त्यांना मला सांगायचे आहे कि,,




भगवंताने ज्या श्रेष्ठ धम्माचा उपदेश केला आहे, त्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते. कालांतराने नाही, तर जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाद्वारे कोणत्याही शीलवंताला आणि प्रज्ञावंताला अनुभवुन पाहता येते.





भगवान बुद्धाने सांगीतलेले सर्व सिद्धांत अनुभवावरुनच सांगीतलेले आहेत, ते काल्पनिक नाहीत. भगवान बुद्धांनी ते त्यांच्या अनुभवातुनच सांगीतलेले आहेत, आणि आपल्यासारखा कोणताही व्यक्ती त्याचा अनुभव घेऊ शकतो....




बुद्ध हे आपलेच एक विकसीत रुप होय...


जगातील प्रत्येक ईश्वरवादी धर्माचे संस्थापक स्वतःला ईश्वराचा अवतार अथवा संदेष्टा सांगतात आणि आपलाच धर्म हा ईश्वराचा धर्म आहे असा दावा करुन मोकळे होतात, परंतु माझ्या धर्माचा संस्थापक व्हायला अगोदर स्वतःची योग्यता सिद्ध करावी लागते. त्याला सम्यक संबुद्धत्त्वाची प्राप्ती करावी लागते. सम्यक संबुद्ध कोणी ईश्वर नव्हे. नाही त्याचा अवतार अथवा दूत. सम्यक संबुद्ध आपल्या सारख्या मानवांचेच एक विकसीत रूप होय. कोणताही मानव महत्त्वकांक्षेने ते पद प्राप्त करु शकतो. आणि त्या पदापर्यंत पोहोचणारा मनुष्य सर्व विश्वाचे रहस्य जाणणारा बनतो. तो निर्वाण पदाची प्राप्ती करुन दुःख मुक्त होतो...




तथागत तर केवळ मार्गदर्शक आहेत...



सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठधर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धांचा धर्म होय. इतर धर्म निरर्थक आहेत. या धर्मात ईश्वराची भक्ती शिकवली जात नाही. या धर्मात आत्म्यालाही स्थान नाही. बौद्ध धर्माचा मुळ पाया दुःख हा आहे, आणि दुःखमुक्त होण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्याऐवजी भगवान बुद्ध स्वतः दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग सांगतात आणि त्या मध्यम मार्गावर चालुन मनुष्याने स्वतःच दुःखमुक्त व्हावे हा बुद्धाच्या धर्माचा उद्देश आहे.





आपल्यालाच प्रयत्न करायचा आहे, तथागत तर केवळ मार्गदर्शक आहेत...




कारण इतर धर्मसंस्थापकांप्रमाणे भगवान बुद्धांनी कधीच दावा केला नाही कि मी मोक्षदाता आहे माझ्या धर्मात आल्यावर मी तुम्हाला स्वर्गात जागा मिळवुन देईन. नाही माझ्या संघामध्ये आल्यावर तुम्ही दुःखमुक्त व्हाल. त्यासाठी तुम्हाला धम्ममार्गावर चालावे लागेल, त्यासाठी तुम्हाला कोणाचीही भक्ती करण्याची गरज नाही. 



बुद्धाने अहिंसेबरोबरच इतर अनेक गोष्टींचाही हिरीरीने पुरस्कार केला आहे. हि गोष्ट विसरता कमा नये. सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचाही बुद्धाने पुरस्कार केलेला आहे. बौद्धधर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी साजेसा असा धर्म असुन तो इहलोकीच मनुष्यमात्राला मुक्त करण्यास सर्वतोपरी समर्थ असाच धर्म आहे. म्हणुन मेल्याशिवाय स्वर्ग न दिसु देणाऱ्या इतर कोणत्याही धर्मापेक्षा तो केव्हाही श्रेष्ठच ठरणार.....



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


पुजेचा खरा अर्थ (नक्की वाचा)

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)

मराठी धम्मपद

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)






बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याचा राज्यभिषेक झाला. बिंबीसार राजाची राजधानी राजगृह होती तर त्याच्या पित्याचे नाव महापद्म असे होते. बिंबीसार हा शिशुनाग वंशाचा पाचवा राजा होता. त्याने कोसल देशाची राजकन्या (प्रसेनजीतची बहीण) कोसल्यादेवी सोबत लग्न केले होते.



मगधचे राज्य हे पुर्वीपासुनच संपन्न राज्य होते. येते वाहणाऱ्या बारमाही नद्यांमुळे शेतील योग्य पाणीपुरवठा झाल्याने धनधान्याची मुबलकता राहत असे. मगध राष्ट्राच्या शेजारी कोसल, अंग आणि वज्जी ही बलवान राज्ये होते., त्याचप्रमाणे मगधसुद्धा बलवान व्हावे अशी बिंबीसाराची महत्त्वकांक्षा होती.


बिंबीसाराने लिच्छवी राजकन्येशी विवाह केला आणि तिच्यापासुन हल आणि विहल हि दोन मुले झाली. लिच्छवी राजकन्येशी लग्न करताना त्याने चेटक राजाला सयेनाग नावाचा हत्ती व अठरा पदरी सोन्याची माळ दिली. त्यानंतर भद्र देशाच्या खेत्रा आणि चौथी राणी विदेह देशाची राजकन्या होती.



बिंबीसार राजाची प्रशासन व्यवस्था अतिशय चोख होती. तो एक शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट प्रशासक होता, गुन्हेगारांना तो कधीच क्षमा करीत नसे. बिंबीसाराच्या कारकिर्दीत कलेचा खुप प्रसार झाला होता, त्याचप्रमाणे शिक्षणाचाही प्रसार झाला होता. मगध साम्राज्याचा खरा पाया घालणारा बिंबीसार राजा होता.





बोधीसत्त्वासोबत भेट


एकदा सिद्धार्थ गौतम कपिलवस्तुवरुन राजगृह येथे आले होते, त्यावेळी सिद्धार्थ पांडव टेकडीच्या पायथ्याशी लहानशी झोपडी तयार करुन निवास करीत होतात, एकदा बिंबीसाराने सिद्धार्थाला शहरातुन फिरताना बघितले. सिद्धार्थ पांडव टेकडीवर गेला जायला निघाला होता, सिद्धार्थाला बघुन अति आदराने आणि मोजक्याच लवाजम्यासह तो सिद्धार्थाकडे जायला निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असलेला राजा टेकडी चढुन गेला. त्याठिकाणी आसनस्थ असलेला तेजस्वी सिद्धार्थ गौतम त्याच्या दृष्टीस पडला. सिद्धार्थाचे शारिरीक सौंदर्य आणि चेहऱ्यावरील झळकणारी शांती पाहुन राजा बिंबीसार प्रेमपुर्वक आदरभावाने त्याच्याजवळ गेला आणि मोठ्या आदराने विचारपुस केली, मग राजा सिद्धार्थाजवळ बसला. आणि म्हणाला,,

माझी तुझ्या कुटुंबाशी फार मैत्री आहे, राज्यसत्तेचा उपभोग घेण्यापेक्षा संन्यासी जीवन जगण्याचा निश्चय तुझ्या मनात कसा आला.? दुसऱ्याने दिलेले अन्न ग्रहण करावे हे तुला शोभत नाही. तुला जर तुझ्या वडिलाचे राज्य नको असेल तर तु माझे अर्धे राज्य घे. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमाला अनुसरुन वाग यामुळे मानवी जीवनाचा हेतु पुर्ण होतो. हे सर्व ऐकुन झाल्यावर सिद्धार्थाने आपल्या गृहत्यागाचे कारण सांगीतले त्यावर बिंबीसार म्हणाला, तुझे ध्येय पुर्ण झाल्यावर मला भेटण्याची कृपा कर...



सम्यक संबुद्धासोबत भेट


सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्त होऊन सम्यक संबुद्ध झाल्यावर राजगृहात आला होता. त्याने आपल्या धर्माचा उपदेश हजार जटील साधुंना दिला होता. ही सुवार्ता ऐकुन बुद्धाविषयी लोक चर्चा करु लागले होते. बिंबीसार राजाला भगवान बुद्ध शहरात आल्याचे समजले. बिंबीसाराने विचार केला कि, अत्यंत दुराग्रही अशा जटीलांना दीक्षा देणे हि साधी गोष्ट नव्हती. तो विद्वान सर्वज्ञानी लोकांना मार्गदर्शन करणारा देव व मनुष्यांचा गुरूच असला पाहिजे आणि सत्याचाच उपदेश करीत असला पाहिजे. अशा या माणसाचे दर्शन घेणे योग्य आहे असे बिंबीसार राजाला वाटले. बिंबीसार भगवान बुद्धांकडे गेला, अभिवादन करुन त्यांच्या जवळ बसला, भगवंतांनी त्याला उपदेश केला. भगवंतांचा उपदेश ऐकुन मगध राजा बिंबीसार म्हणाला,,

भगवंत पुर्वी राजपुत्र असताना माझ्या पाच इच्छा होत्या आता त्या पुर्ण झाल्या आहेत.



१. पुर्वी मी राजपुत्र असताना मला राज्यभिषेक केला तर फार चांगले होईल, ती माझी इच्छा पुर्ण झाली.

. एखादा सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगले होईल. ती देखील इच्छा पुर्ण झाली आहे.

३. मला त्या भगवंताची सेवा करायला मिळाली तर चांगले होईल.

४. भगवंतांनी आपला धर्म शिकवावा

५. भगवंताचा धर्म मला कळावा.





अशा माझ्या पाच इच्छा होत्या व त्या पुर्ण झाल्या आहेत. भगवंतांनी मला आपला आजन्म शरण आलेलाउपासक म्हणुन स्वीकार करावा. भगवान बुद्धाने बिंबीसाराला बौद्ध उपासक बनविले. बिंबीसाराने बुद्धाच्या धर्माचा स्वीकार केला... राजा बिंबीसार भगवान बुद्धाचा श्रेष्ठ उपासक आणि धम्माचा प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबीसाराने भगवंतांना भिक्षु संघासोबत जेवनाचे आमंत्रण दिले व स्वतःच्या हाताने जेवन वाढले व त्याचे वेळूवन भगवान बुद्धांना व भिक्षुसंघाला दान दिले. 


बिंबीसार राजा हा बौद्ध धर्माचा निष्ठावान उपासक होता. त्याने बौद्ध धर्माचे धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले. तेव्हापासुन उपोसध पर्व सुरु झाले. भिक्षु संघ निरोगी राहावा म्हणुन त्याने अनेक उपाययोजना केल्या. बिंबीसार राजाचा डॉ. जीवक नावाचा राजवैद्य बौद्ध उपासक होता. तो अतिशय विद्वाण असा डॉक्टर होता.


एके दिवशी राजा बिंबीसाराने भगवान बुद्धाला पायाच्या नखाचा तुकडा मागितला व त्या नखाच्या तुकड्यावर राजाने एक स्तुप बांधला. राजघराण्यातील स्त्रीया दररोज संध्याकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करुन त्या स्तुपावर फुले चढवित आणि दीप प्रज्वलीत करीत.



अशाप्रकारे धर्मप्रचाराची सुरुवात राजा बिंबीसाराने स्वतःच्या घरातुन केली त्यामुळे बिक्षु संघाला आणि धर्म प्रचाराच्या कार्याला अनुकुलता प्राप्त झाली. बुद्धाच्या काळातच बिंबीसार राजाने धर्मप्रचाराकरिता चांगलीच मदत केली........


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

ब्राह्मण वर्णाची थोरवी (मज्झिम निकाय : अश्वलायन सुत्त)

चारही वर्णांमध्ये ब्राह्मणच सर्वश्रेष्ठ बाकिचे सर्व वर्ण हीन अशी ब्राह्मणांची समजुत होती परंतु भगवान बुद्धांनी त्यांचा हा सिद्धांत नाकारला. व मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावरुन ठरत नसते हे ब्राह्मणांना पटवुन देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची कथा मज्झिमनिकायाच्या अश्वलायन सुत्तामध्ये आली आहे, प्रस्तुत सुत्तामध्ये भगवान बुद्ध आणि अश्वलायन ब्राह्मण कुमारामध्ये झालेली चर्चा सांगीतलेली आहे..


एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जेतवनात आराम करत असताना त्यावेळी निरनिराळ्या राष्ट्रांतुन पाचशे ब्राह्मण श्रावस्तीला आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये असा मुद्दा निघाला कि, हा श्रमण गौतम चारही वर्णांना मोक्ष आहे असे म्हणतो. त्याच्याशी या मुद्द्यावर वादविवाद करुन त्याला वादविवादात हरविण्याला कोणी समर्थ आहे का.?


खुप वेळ झाल्यावर निष्कर्ष निघाला कि,, अश्वलायन नावाच्या ब्राह्मणकुमाराने श्रमण गौतमाशी वाद करावा.



अश्वलायन कुमाराचे अध्ययन नुकतेच पुर्ण झाले होते. तो खुप हुशार होता, त्याला सर्व वेद तोंडपाठ येत होते. तथापि, भगवान बुद्धांसोबत वाद करणे कठीण आहे, हे तो जाणुन होता. जेव्हा त्याला वादविवादात पुढे जाण्याची ब्राह्मणांनी विनंती केली तेव्हा अश्वलायन ब्राह्मणांना म्हणाला,, 'श्रमण गौतम हा धर्मवादी आहे, आणि धर्मवादी लोकांशी वाद करणे खुप कठीण आहे. जरी मी सर्व वेदांमध्ये पारंगत असलो, तरी श्रमण गौतमासोबत वाद करायला समर्थ नाही.


यावर ब्राह्मण अश्वलायन कुमाराला म्हणाले, हे अश्वलायन, तुझ्याएवढा धर्मज्ञानी आमच्यामध्ये दुसरा कोणीही नाही. तु परिव्राजक धर्माचा अभ्यासक आहेस, आणि युद्ध न करता पराभव स्वीकारणे तुला योग्य नाही.


अश्वलायन म्हणाला, गौतमासोबत वाद करणे खुप कठीण काम आहे, परंतु तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी गौतमाशी वादविवाद करायला तयार आहे....


नंतर त्या सर्व ब्राह्मणांसोबत अश्वलायन भगवान बुद्धांजवळ गेला, आणि बाजुला बसला आणि बुद्धाला म्हणाला,,


हे गौतमा ब्राह्मणांचे म्हणने आहे कि ब्राह्मणवर्णच सर्वश्रेष्ठ आहे, बाकिचे सर्व वर्ण हीन आहेत. ब्राह्मणांनाच मोक्ष मिळतो, इतरांना नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातुन उत्पन्न झाल्याने तेच सर्वश्रेष्ठ आहेत, इतर सर्व हीन आहेत. या मुद्याबद्दल आपले काय म्हणने आहे..?


यावर भगवान म्हणाले,, हे अश्वलायन कुमार, ब्राह्मणांच्या बायका गरोदर होतात, प्रसुत होतात, बाळांना जन्म देतात. याचप्रमाणे ब्राह्मणांची संतती इतर वर्णियांप्रमाणेच आईच्या उदरातुन जन्मली असताना, ब्राह्मणांना आपण ब्रह्मदेवाच्या मुखातुन जन्मलो असा समज आहे.


भगवान म्हणाले, हे अश्वलायन यौन, कंबोज व इतर सरहद्दीवरील प्रदेशात आर्य आणि दास असे दोनच वर्ग असुन कधी कधी आर्याचा दास होतो आणि दासाचा आर्य होतो हि गोष्ट तुला माहीत आहे काय..?

यावर अश्वलायन म्हणाला, होय गौतमा मी याबद्दल ऐकले आहे..

भगवान म्हणाले,, जर असे आहे तर ब्राह्मणांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातुन झाली, आपल्या या म्हणण्याला आधार काय.?


यावर अश्वलायन म्हणाला, हे गौतमा याबाबत आपले म्हणने काही असो, परंतु ब्राह्मणांची अशी समजुत आहे कि, ब्राह्मणच सर्व वर्णात श्रेष्ठ आहेत, आणि बाकिचे इतर सर्व वर्ण हीन आहेत.


भगवान म्हणाले, क्षत्रीयाने, वैश्याने किंवा शुद्राने चोरी केली, व्यभिचार केला, चहाडी केली, व्यर्थ बडबड केली, द्वेषबुद्धी वाढविली, नास्तिकपणा अंगिकारला, तर तो नरकात जाईल, परंतु ब्राह्मणांनी हि पापकर्मे केली तर तो नरकात जाणार नाही, असे म्हणायचे आहे का तुला..?



अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने हि पापकर्मे केली असता तो नरकातच जाईल.


भगवान म्हणाले, एखादा ब्राह्मण प्राणघातापासुन निवृत्त झाला, शिवीगाळ करण्यापासुन निवृत्त झाला., चोरी करण्यापासुन निवृत्त झाला., द्वेषापासुन निवृत्त झाला., तर तो स्वर्गात जाईल परंतु इतर वर्णाच्या लोकांनी हि चांगले कर्म केले असता ते स्वर्गात जाणार नाहीत असे म्हणायचे आहे का तुला...?


अश्वलायन म्हणाला, कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने ही चांगली कर्मे केली असता तो स्वर्गातच जाईल. पुण्यकर्माचे फळ ब्राह्मणाला आणि ब्राह्मणेत्तरांना सारखेच मिळेल.


भगवान म्हणाले, या प्रदेशात केवळ ब्राह्मणच द्वेषविरहित मैत्रीभावनेने विहार करु शकतो काय.? क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र वर्णाच्या लोकांना हे जमणार नाही असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा, चारही वर्णाच्या लोकांना मैत्रीभावनेने विहार करता येईल.


भगवान म्हणाले, मग चारही वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आणि बाकिचे सर्व वर्ण हीन आहेत या म्हणण्याला आधार काय आहे.?


अश्वलायन म्हणाला, आपण काहीही म्हणा परंतु ब्राह्मणांची अशी समजुत आहे कि चारही वर्णात ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत आणि बाकिचे हीन.


भगवान म्हणाले, हे अश्वलायन समज एखाद्या राजाने विविध जातीच्या शंभर लोकांना एकत्रीत केले, त्यांच्यापैकी क्षत्रीय, ब्राह्मण कुळात जन्मलेल्यांना म्हणेल कि, चंदन वृक्षांच्या लाकडांना जाळुन अग्नी उत्पन्न करावी, आणि हीन कुळात जन्मलेल्या लोकांना सांगेल कि, कुत्र्याच्या खाण्याच्या भांड्यात एरंडाचे उत्तरारणी करुन अग्नी उत्पन्न करावी. हे अश्वलायन, क्षत्रीय व ब्राह्मण वर्णाच्या लोकांनी केलेला अग्नी अधिक तेजस्वी होईल. व हीन वर्णाच्या लोकांनी केलेला अग्नी होणार नाही, त्या अग्नीची कार्ये होणार नाहीत असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा, कोणत्याही जातीच्या माणसांनी पेटविलेला अग्नी सारखाच तेजस्वी होईल.


भगवान म्हणाले, एखाद्या क्षत्रीयाने ब्राह्मण कन्येसोबत शरीरसंबंध ठेवले, आणि त्या संबंधापासुन त्यांना मुलगा झाला, तर तो आपल्या आईसारखा किंवा वडिलांसारखा होईल असे तुला वाटते..? त्याचप्रमाणे एखाद्या ब्राह्मण कुमाराने क्षत्रीय कन्येसोबत केलेल्या शरीरसंबंधाने त्यांना मुलगा झाला असता होणारा मुलगा त्या दोघांसारखा न होता वेगळ्या जातीचा होईल असे तुला वाटते काय..?


अश्वलायन म्हणाला, अशा प्रकारच्या संबंधामुळे झालेला मुलगा त्याच्या आईवडीलांप्रमाणेच होईल. त्याला क्षत्रीय किंवा ब्राह्मणही म्हणता येईल.


भगवान पुढे म्हणाले, पण अश्वलायन एखाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधातुन निर्माण झालेल्या शिंगरुला त्याच्या आईसारखे किंवा वडिलासारखे म्हणता येईल काय.?

अश्वलायन म्हणाला, नाही गौतमा तो तिसऱ्याच जातीचा बनेल., त्याला घोडा किंवा गाढव म्हणता येणार नाही. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रीया यांच्या संबधातुन झालेल्या मुलाबद्दल असे म्हणता येणार नाही.



भगवान म्हणाले. हे अश्वलायन दोघा ब्राह्मण भावांपैकी एक वेदपठन केलेला चांगला सुशिक्षीत असेल आणि दुसरा अशिक्षीत. तर ब्राह्मण त्यांच्यापैकी कोणाला यज्ञामध्ये आमंत्रीत करतील..?


अश्वलायन म्हणाला, जो सुशिक्षीत असेल आणि वयाने लहान जरी असला तरी त्यालाच यज्ञामध्ये प्रथम आमंत्रीत केले जाईल.


भगवान म्हणाले, जर दोन भावांपैकी एक मोठा विद्वान आहे, पण अत्यंत दुराचारी आहे ; दुसरा फारसा विद्वान नाही परंतु शीलवान आहे, तेव्हा या दोघांपैकी प्रथम कोणाला आमंत्रीत करण्यात येईल..?


अश्वलायन म्हणाला, जो शीलवान आहे त्यालाच प्रथम आमंत्रीत केले जाईल, दुराचारी मनुष्याला दिलेल्या दानापासुन काय लाभ मिळणार..?



भगवान म्हणाले, हे अश्वलायन प्रथम तु जातीला महत्त्व दिलेस, नंतर वेदपठणाला आणि आता शीलाला महत्त्व देत आहेस. अर्थात मी जी चातुर्वर्णाची शुद्धी सांगतोय तिचा तु अंगीकार केला आहेस.


भगवान बुद्धांचे हे भाषण ऐकुन अश्वलायनाला काही सुचतच नव्हते,


भगवान म्हणाले, हे अश्वलायना प्राचीन काळी सात ब्रह्मर्षी अरण्यात राहत असताना, त्यांची एक अशी पापी समजुत झाली होती कि, ब्राह्मणवर्णच सर्वश्रेष्ठ आहे बाकिचे इतर वर्ण हीन आहेत, असीत ॠषीला जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा आपली हजामत करुन घेऊन त्या सात ब्राहण ॠषींच्या निवसाजवळ आला, व त्यांच्यासमोर चंक्रमण करत म्हणाला, हे ब्रह्मॠषी कोठे दिसत नाही बरे..?


असीत ॠषींचे हे उद्धटपणाचे वागणे ऐकुन त्या ब्राह्मणांना राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, हे चांडाळा तु भस्म हो.. परंतु त्या शापाचा असीत ॠषींवर काहीएक परीणाम न होता तो अधिकच तेजस्वी दिसु लागला.



तेव्हा ते ब्रह्मॠषी एकमेकांनाच म्हणाले,, अरेरे आमचे तप व्यर्थ आहे, आमचे ब्रह्मचर्य निष्फळ आहे, आमच्या शापाचा याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.


असीत ॠषी म्हणाला, तुमचे तप व्यर्थ नाही, तुमचे ब्रह्मचर्य निष्फळ नाही, तुम्ही विनाकारण रागावणे सोडले पाहिजे.


असीत ॠषी म्हणाला, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे व इतर वर्ण अशी तुमची समजुत झाली आहे, असे मी ऐकले आहे, पण तुमच्या पुर्वजांनी ब्राह्मण स्त्रीसोबतच लग्न केले आहे, याची तुम्हाला खात्री आहे काय..? तुमच्या आज्यांनी पणज्यांनी व इतर पुर्वज स्त्रीयांनी ब्राह्मण पुरुषांशीच संबंध ठेवला होता याची तुम्हाला खात्री आहे काय..?


ब्रह्मॠषी म्हणाले, नाही आम्हाला याबद्दल काहीच सांगता येणार नाही.


असीतॠषी म्हणाला, तर मग ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ व इतर वर्ण हीन आहेत याला अर्थ काय..? या प्रश्नाने ते सात ब्रह्मॠषी निरुत्तर झाले.


हे ऐकुन अश्वलायन भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने खुप प्रभावित झाला, आणि भगवान बुद्धांचा उपासक झाला.....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)


आजकाल काही लोक महान तत्त्वज्ञानी असल्याचा बुरखा पांघरुन फेसबुकवर स्वतःच्याच सोयीचे लिहिताना दिसतात, त्यात संशोधन वगैरे काहीच नसते, तर विशिष्ट समाजाबद्दल अथवा धर्माबद्दल द्वेष अथवा चुकीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न त्यातुन दिसत असतो.. असो..

अशाच प्रकारचे वक्तव्य एक स्वतःला महान तत्त्वज्ञानी समजणाऱ्याने केले, तो म्हणतो..





• पियदस्सी (अशोक) हा बौद्ध राजा होता याला बौद्ध ग्रंथांशिवाय काहीही पुरावा नाही. 

• शिलालेखात त्या राजाचे नाव उपाधी म्हणून देवानाम पियं पियदस्सी असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल?

• तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही...




हे सर्व आरोप अगदी चुकीची व बिनबुडाचे आहेत. बहुतांश वेळा कमी अथवा चुकीच्या माहीतीमुळे असले प्रकार घडत असतात,, परंतु लोकांनी अशा फसव्या माहीतीवर विश्वास न ठेवता, सत्य काय आहे याची सहानिशा करावी...

तर सत्य काय आणि असत्य काय हे जाणण्यासाठी आपण अशोकाच्या शिलालेखाचा उपयोग पुरावा म्हणुन घेवुया..








१. पियदस्सी (अशोक) हा बौद्ध राजा होता याला बौद्ध ग्रंथांशिवाय काहीही पुरावा नाही..



सम्राट अशोकाने वा पियदस्सीने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला असे एका शिलालेखावरुन समजते. कलिंग युद्धानंतर आपल्याला पश्चाताप झाला असल्याचे सांगताना तो राजा लिहितो.. देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या आठ वर्षांनंतर कलिंग राष्ट्र जिंकला, त्या युद्धामध्ये दिड लाख लोक बेघर झाले, एक लाखाच्या वर लोक मारले गेले. कलिंग जिंकल्यानंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजा धर्म शिक्षेने प्रभावित झाला, आणि कलिंगच्या युद्धाने झालेल्या हानीमुळे त्याला खुप पश्चाताप झाला...



बैराट जवळील भाब्रु येथील एका लघुगिरिलेखात राजा लिहितो, प्रियदर्शी, मगधचा राजा, संघाला वंदन करतो, आणि त्यांच्या हिताची व सुखाची कामना करतो. तुम्हाला माहित आहे आदरणीय गुरु माझी बुद्ध, धम्म व संघावर किती श्रद्धा आहे. बुद्धाने जे काही सांगीतले ते उत्तम सांगीतले.


या शिलालेखावरुन आपल्याला समजते कि सम्राट प्रियदर्शी हा बौद्ध होता.


बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर सम्राट प्रियदर्शी (अशोक) त्यांचे धम्मगुरु महास्थाविर मोगलीपुत्त तिस्स यांच्या उपदेशानुसार आचार्य उपगुप्त यांच्या मार्गदर्शनात ते धर्मयात्रेला जातात सर्वप्रथम ते लुंबिनीला जातात, राजाने बुद्ध जन्मस्थानाची पुजा केल्यावर तिथे के शिला स्तंभावर एक अभिलेखो खोदतो. ति गाथा मला पाठ आहे म्हणुन सांगतो



देवानं पियेन पियदसिन वीसतिवसाभिसि तेन ‬अतन आगाच महीयिते हिद बुधे जाते सक्यमुनीति ‬सिलाविगडभीचा कालापित सिलाथभे च उसपापिते हिद भगवं जातेति लुंमिनिगामे उबलिके कटे अठभागिये च 


अर्थ : देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या वीस वर्षानंतर स्वतः येथे येऊन या स्थानाची पुजा करतो कारण इथेच भगवान बुद्धांचा जन्म झाला. इथे दगडाची भिंत बांधली गेली आणि शिलास्तंभ खोदला गेला, या गावात भगवान बुद्धांचा जन्म झाला असल्या कारणाने लुंबीनी गाव करमुक्त करतो आणि आपल्या उत्पन्नाचा आठवा भाग या गावाला देतो...



या शिलालेखावरुनच भगवान बुद्धांचा जन्मस्थान लुंबीनी मानला गेला.




हे शिलालेख वाचल्यावरच समजुन येते कि, सम्राट प्रियदर्शी (अशोक) हा बौद्ध सम्राट होता... लुंबिनीवरुन सम्राट कपिलवस्तुला आले. कपिलवस्तु हि राजा शुद्धोधनाची राजधानी होती. कपिलवस्तुवरुन धर्मयात्रा बुद्धगयेस गेली. सम्राटांनी बोधीवृक्षाची पुजा केली ज्या वृक्षाखाली बसुन सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. सम्राटाने बुद्धगयेस एक भव्य विहार बांधला. गयेचा तो महाबोधी महाविहार आजही तिथे आहे. 


बुद्धगयेवरुनसारनाथला सम्राटाची धर्मयात्रा आली, सम्राटाने येथेही स्तुप व विहार बंधले. सारनाथ येथील स्तंभावर कोरलेले चारही दिशांना गर्जना करणारे चार सिंह व खाली धम्मचक्र हे भारताने आपली राष्ट्रीय प्रतिके म्हणुन स्वीकारली आहेत. 


वरील सर्व पुराव्यांवरुन सिद्ध होते कि सम्राट प्रियदर्शी (अशोक) हा एक बौद्ध सम्राट होता..







२. तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही....




वरील पुराव्यांनिशी हे सिद्ध होते कि प्रियदर्शी हा एक बौद्ध सम्राट होता, मग असल्या बिनबुडांच्या आरोपात किती तथ्य आहे हे आपल्याला समजते. दुसरा प्रश्न हा कि राजा प्रियदर्शी हाच राजा अशोक होता, असे एकाही शिलालेखावरुन सिद्ध होत नाही असे टिकाकारांचे म्हणणे आहे.


१९१५ साली कर्नाटक राज्यातील रायचुरा जिल्ह्यातील मास्की या गावात एक शिला लेख सापडला, त्या शिलालेखामध्ये सामान्यपणे लिहिल्या जाणार्या 'देवानांपिय पियदसी' ऐवजी 'देवानांपिय असोकस' असा उल्लेख आढळला. तर बेल्लारी जिल्ह्यातील असलेल्या एका गावात 'देवानांपिय पियदस्सी' ऐवजी 'राजा असोको देवानांपियो' असा उल्लेख आढळला.


तर १९५५ साली मध्यप्रदेशात सापडलेल्या शिलालेखात 'देवानांपियस्स पियदसिनो असोकराजस' असा उल्लेख आढळला यावरुन कोणीही म्हणु शकेल कि प्रियदर्शी आणि अशोक हि एकाचीच नावे आहेत. मग स्वतःला महान तत्त्वज्ञानी समजणाऱ्यांनी हे न समजुन घेता खोटा प्रचार का करावा...?


वरील दिलेल्या पुराव्यांनी हे सिद्ध होते कि प्रियदर्शी आणि अशोक हि एकाच व्यक्तीची दोन नावे आहेत. आणि महान सम्राट अशोक हा एक बौद्ध सम्राट होता.. तरीसुद्धा वाचकांना त्यांच्या काही शंका असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, तर अवश्य विचारावीत.....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

रविवार, १ डिसेंबर, २०१३

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)


पूर्वीच्या वैदिक धार्माप्रमाणे धर्माप्रमाणे वैदिक लोक सर्व दिशा, सुर्य, चंद्र, नद्या, मोठे ह्यांची सर्व आशीर्वाद किंवा प्राप्तीसाठी पुजा करतात. ब्रह्मदेवाने सर्व सृष्टीची निर्मीती केली आहे, त्यामुळे सृष्टीतील अनेक गोष्टींना देवता मानुन त्याची ते पुजा करतात...


भगवान बुद्ध अशा प्रकारच्या ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांना मानत नव्हते. एकदा एक कुलपुत्र भगवंतांना सहा दिशांची प्रार्थना करताना दिसला, तेव्हा त्यांनी यापुढी अशाप्रकारची प्रार्थना न करण्याचा उपदेश केला. व पुजेचा खरा अर्थ समजावुन सांगीतला. अशा प्रकारची कथा दिग्घनिकायाच्या सिगलसुत्तात आलेली आहे.



भगवान बुद्ध एकदा वेळु वनात राजगीरजवळ वास करीत असताना, सिगल नावाचा तरुण कुलपुत्र अशाप्रकारे सहाही दिशांची पुजा करताना दिसला. भगवंतांनी त्याला विचारले कि अशाप्रकारे तु कशाची पुजा करीत आहेस. तेव्हा सिगल म्हणाला, माझ्या वडीलाने मृत्युपुर्व सांगितलेल्या पवित्र शब्दांचा आदर करण्यासाठी मी अशाप्रकारे पुजा करीत आहे, त्यांनी मला सहा दिशांची पुजा करायला सांगितले..


त्यामुळे अशा प्रकारची पुजा केल्याने मला देवाचा आशिर्वाद प्राप्त होईल.


तेव्हा भगवान म्हणाले, ठीक आहे तु पुजा कर..! परंतु तुला तो विधी समजला नाही. तुथे पहिले कर्तव्य आहे कि तुझे घर सांभाळावे, तुझी पत्नी, तुझी मुले सांभाळावीत व त्यांना कोणतेही वाईट कृत्ये करण्यापासुन परावृत्त करावे. मी तुला ह्या सहा दिशांचा अर्थ सांगतो तो असा आहे.





•आई वडील हे पुर्व दिशा आहेत.
•शिक्षक हे दक्षिण दिशा आहेत.
•मुले, पत्नी हे पश्चिम दिशा आहेत..
•मित्र व नातेवाईक हे उत्तर दिशा आहेत.
•सहकारी व नौकर हे खालची दिशा आहेत.
•तर श्रमण व ब्राह्मण आणि इतर धार्मिक व्यक्ती हे वरची दिशा आहेत.




तेव्हा सिगल म्हणाला, भगवान मला याविषयावर सविस्तर माहिती सांगा...





पुजेचा खरा विधी





सिगल, मी तुला पुजेचा विधी समजावुन सांगतो,, पुजा करण्यापुर्वी तु आणि कोणताही गृहस्थ चार प्रकारच्या कर्मक्लेशांपासुन, पापांच्या चार कारणांपासुन तसेच विपत्तीच्या सहा द्वारांचा त्याग करायला हवा.



•चार दुर्गुण•


माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त राहायला शिकविले पाहिजे.


•जीवहत्या करणे, 
•न दिलेले जबरदस्तीने घेणे, 
•व्यभिचार करणे आणि 
•असत्य बोलने, हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत.


सिगल, हे लक्षात ठेव की,



•पक्षपातीपणा, 
•शत्रूत्व, 
•मुर्खपणा आणि 
•भय हि पापांची कारणे आहेत, यामुळे पापकर्म घडत असतात. यांपैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही...



माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करु नये असे शिकविले पाहिजे .



• सहा प्रकारची संकटे •




•मद्यपानाचे व्यसन, 
•अवेळी रस्त्यावरुन भटकत राहने, 
•जत्रांतून परिभ्रमण करणे, 
•जुगाराची सवय जडणे, 
•कुमित्रांची संगत धरने आणि 
•आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीची धूळधाण होते.





१. मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उदभवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शील भ्रष्टता, अश्लील वर्तणुक आणि बुध्दीनाश ही ती सहा संकटे होत.


२. अवेळी रस्त्यावरुन भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो. तो म्हणजे, तो स्वत: , त्याची बायकामुले आणि त्याची मालमत्ता ही असुरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही, त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात. आणि त्यांना त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो.


३. जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करत राहतो की, नाचणे, गाणे , बजावने, काव्य, गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का?


४. जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी सहा संकटे म्हणजे,



•खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेश करतात, 
•हरला तर द्रव्य नाशाबद्दल तो स्वत: शोक करतो. 
•त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, 
•न्यायालयासमोर त्यांच्या शब्दाला किंमत उरत नाही, 
•त्याचे मित्र आणि त्याचेसहकारी त्याचा तिरस्कार करतात. 
•लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. 
(कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालन पोषण कसे करता येणार?)




५. कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी, व्यभिचारी, दारुबाज, लबाड, पैसेखाउ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते.



६. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे, तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गर्मी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला, म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो हातात फार काम आहे म्हणून मी काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी हौ लागते.




• व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे.•


मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुत शत्रु असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत.


•लोभी पुरुष, 
•बोलघेवडा परंतु कृतीने शून्य, 
•खुशामत्या पुरुष आणि 
•उधळ्या वृत्तीचा पुरुष...



१. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरुन मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रूसारखा वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भितीने आपले कर्तव्य करीत असतो. परंतु त्याचा मुळ हेतू स्वार्थ साधने हा असतो.


२. जो बोलघेवडा आहे तो कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो.


३. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्ये करायला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो.


४. त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाचतमाशा पाहतांना तो तुम्हाला सोबत करतो . तुम्ही द्युतक्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो.



५. मन:पूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात,


•सहाय्यक, 
•सुखादु:खामध्ये समान मैत्री ठेवणारा,
•सदवर्तनाचा सल्ला देणारा आणि 
•सहानुभूती दाखविणारा सहाय्यक..



हे खरे मित्र समजा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की, तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवितो.



६. सुख - दु:खामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हांला सांगतो. तुमची गुपितो तो गुप्त ठ्वतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग कतीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार होतो.



७. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो. सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऎकले नाही अशा चार गॊष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो.



८. तुमच्या बद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दु:खाने दु:खी होतो. सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो, असे भगवंत म्हणाले.




चार कर्मक्लेशांचा, चार पापांच्या कारणांचा आणि विपत्तीच्या सहा द्वारांचा त्याग केल्यावर गृहस्थाने सहा दिशांचा आरंभ करावा...






१. पुर्व दिशा : आई वडील...



पुजेची प्रथम दिशा आहे पुर्व दिशा म्हणजे आई वडील, त्यांच्या पुजेची पाच अंगे आहेत.

मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सदगुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपतात.






२. दक्षिण दिशा : शिक्षक



शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावरुन उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतात ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्यांच्यासंबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व त-हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात.






३. पश्चिम दिशा : पति-पत्नीसाठी विनय



१. पतीने आपल्या पत्नीची सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करुन, तिच्याशी एकनिष्ठेने वागून, तिला सत्ता देउन, तिला लागणारे दागदागिने पुर्वून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर-माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करुन आपले कर्तव्य बजविते. ती पातिव्रत्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते.







४. उत्तर दिशा : मित्र व नातेवाईक




कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्यानेने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत:त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदअवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात.







५. खालची दिशा : धनी व सेवक यांसाठी विनय



धन्याने नोकर-चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे :



•त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. 
•अन्न व मजुरी द्यावी. 
•ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रुषा करावी.
•असाधारण स्वादिष्ट पक्वान्ने त्यांनी वाटून खावी. 
•वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी.



कारण नोकरचाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यांत ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची किर्ती सर्वत्र वाढवितात.






६. वरची दिशा : धर्मगुरु



कुलपुत्राने आपल्या धर्मगुरुची सेवा काया वाचा आणि मनाने, त्याच्यावर प्रिती करुन, आपल्या घराचे दार सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऎहिक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरु आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड:मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.




निष्कर्ष...


१. जो धर्म मानवधर्म आहे तो मानवाला सहा दिशांची पूजा करण्याऎवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरु यांचा मान राखायला शिकवितो......


भगवंतांनी सिगलला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर! फार सुंदर! एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुप्त होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाने भगवंतांनी मला सत्य विषद करुन सांगितले आहे.

मी भगवंतांना, त्यांनी सांगितलेल्य धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा.


आज अडीच हजार वर्षांनंतरही त्या महामानवाची शिकवण काळाशी किती सुसंगत वाटते.. कारण भगवान बुद्धांचा धम्म अकालिको आहे, त्याला काळाची काही सीमा नाही.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :


१. भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

२. मराठी धम्मपद

३. रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...