शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

५७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि बौद्ध समाजापुढे असलेली आव्हाने...

जय भीम मित्रहो, धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या ५७ व्या वर्धापण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी आपल्या लक्षावधी बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि हजारो वर्षे खितपत पडलेल्या समाजाला सदाचारी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.....



ह्या सत्तावन वर्षाच्या कालखंडात बौद्ध झालेल्या आंबेडकरी समाजाने इतर दलीत समाजापेक्षा केलेली कामगीरी अतुलनीय आहे,, असा हा समाज आपले पारंपारिक व्यवसाय सोडुन सर्वर्णांच्या खांद्याला खांदा मिळवुन त्यांच्याशी स्पर्धा करु लागला आहे. पण याची दुसरी बाजु खुप वाईट आहे, त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.




धम्मचक्रप्रवर्तन दिनापासुन आजपर्यंत हा संपुर्ण समाज बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांनी सांगीतलेल्या मार्गावर चालण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. काही बाहेर बुद्ध आणि घरात खंडोबा घेवुन चालत आहेत, तर काही केवळ इतर समाजाप्रती मनामध्ये द्वेष पसरवत चालले आहेत, तर काही नक्षलवादाची वाट धरत आहेत, काही टोकाचे नास्तिक झालेत, ज्यांना धर्म म्हणजे अफुची गोळी वाटते, तर काहींच्या पोटात शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न जात नाही..... या सर्वांमध्ये आपण बाबासाहेबांनी केलेल्या धर्मचक्रप्रवर्तनाचे मुख्य ध्येय विसरत चाललो आहोत...




यात समाजात द्वेष पसरवणाऱ्या, जहाल व मार्क्सवादी विचारांच्या मार्गावर नेऊ पहाणाऱ्या कथित आंबेडकरी संघटनांमुळे / लेखकांमुळे धर्माला ग्लानी येत आहे.





धम्माचे होणारे राजकीयकरण आधी थांबवा...



डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते कि, "शासनकर्ती जमात बनणे हे आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा." पण काहींनी या वाक्याचा वापर करून समाजाचे भावनिक वशीकरण केले. समाजाला आर्थिक बाबतीत लुटले. लोकांच्या भावनांचे राजकारण केले... आणि त्या घाणेरड्या राजकारणात धर्मालाही गुंफले.



मी संपुर्ण भारत बौद्धमय करेन, हि बाबासाहेबांची शेवटची इच्छा होती,, त्याचेच हे राजकारण करत आहेत. मुळात राजकिय, सामाजिक आणि धार्मिक ह्या तिन्ही प्रकारच्या चळवळी भिन्न आहेत, त्याला एकमेकात मिसळवुन कोणी राजकारण करावे आणि तरूण वर्ग त्याला बळी का पडावा?


अशाप्रकारचा भारतात बौद्ध धर्माचा पुरस्कार करणारे मुळात स्वतःही बौद्ध नसतात,, सत्ता प्राप्त केल्याशिवाय बौद्ध धम्माला राजाश्रय मिळणार नाही, त्याशिवाय भारत बौद्धमय होणार नाही हा विचारच मुळात घटनाविरोधी आहे, सत्तेचा वापर धर्मप्रसारासाठी करणे हे घटनाविरोधी आहे. आपली घटना हि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते.... मुळात धम्माला सत्तेची गरजच काय..?


तर काही विद्वान नेते म्हणतात कि,, सत्ता आल्यावर मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन. यातुन काहीच बोध घेवु न शकण्यासारखे झालो आहोत का आपण? सत्तेसाठी बौद्ध धर्माचा कोणी स्वीकार करत नाही याला काय म्हणावे?
सम्यक संबुद्धाने उपदेशिलेला धम्म हा सदाचाराचा मार्ग आहे, तो न स्वीकारता धम्मविरोधी कृत्य करुन राजकारणासाठी त्याला वेठीस धरणे म्हणजे धम्म द्रोहच नाही तर समाजद्रोह सुद्धा आहे. हे धम्माचे होणारे गलिच्छ राजकारण आता तरूण पिढीने ओळखणे गरजेचे आहे. तेव्हाच राजकारणाद्वारे धम्माला येणारी ग्लानी दुर होईल..




बौद्ध विहारे प्रत्येक खेड्यापाड्यातुन उभारली पाहिजेत व लाखोंच्या संख्येने बौद्ध वाङ्मयाचा प्रसार झाला पाहिजे.



महाराष्ट्रात बौद्ध समाज प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आहे. आणि त्यामुळे त्यांच्यापरीने जेथे तेथे विहारांची उभारणी झाली. पण त्याने काहीच फायदा झाला नाही, त्या भागात बौद्ध वाङ्मय तर खुप दुरचीच गोष्ट पण बुद्धाचा इतिहास पण माहीत रहात नाही, मग काय तर आजीआजोबांकडुन ऐकलेल्या गोष्टींतुन, टी.व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या मालिकांमधुन लहानमुलांच्या कल्पनेतील बुद्ध साकार होतो. पण त्याला काहीच ऐतिहासीक आधार नसतो त्यामुळे, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार होत नाही उलट धम्माला ग्लानी येते.


वर्षावासाच्या काळात आम्ही अनेक खेड्यापाड्यात जाऊन धम्मप्रचार करत असतो, पण खेड्यांतील विहारांची ती दैयनीय अवस्था पाहुन वाईट वाटते. तर मुळात ती विहारेच नसतात. तर भांडे ठेवण्याची गोडावुन बनलेली असतात. शहरी भागात काही प्रमाणात तीच स्थीती असली तरी मात्र तिथे नियमीत वंदना होत असते, लोक विहारात जातात, ग्रंथपठण करतात, धर्माचे तत्वज्ञान जाणतात. पण मोठ्या प्रमाणात हे होत नाही. यावर उपाय करायला हवेत.



आज खेड्यापाड्यात बौद्ध विहारांची निर्मिती होत आहे, पण ति विहारे केवळ शोभेची वास्तु बनलेली आहेत,, जयंती उत्सवानिमित्त्य लागणारे भांडे ठेवण्याची जागा बनलेली आहेत.....


उर्गेन संघरक्षित यांनी इंग्रजी मध्ये विहार वंदना लिहिली आहे ती याप्रमाणे,,




आम्ही हे क्षेत्र, त्रिरत्नास समर्पण करतो.


मानवाच्या संबोधीप्राप्तीचा आदर्श, अशा बुद्धास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


ज्या धम्ममार्गाच्या आचरणास आम्ही सिद्ध झालो आहोत, त्या धम्मास आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो, 


ज्यांचात परस्पर कल्याणमित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो, अशा संघास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो. 


येथे कोणत्याही व्यर्थ शब्दांचे उच्चारण केले जाऊ नये. येथे चंचल विचारांनी आमची मने कंपित होऊ नयेत.


पंचशीलांच्या परिपालनासाठी, ध्यान-साधनेच्या सरावासाठी, प्रज्ञेच्या विकासासाठी, आणि संबोधीच्या प्राप्तीसाठी, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


बाह्य जगात जरी द्वेष उफाळत असला,
तरी येथे मात्र मैत्री नांदो. बाह्य जगात जरी दुःख खदखदत असले, तरी येथे मात्र आनंद नांदो.


पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथाचे पठण करुन नव्हे, किंवा पवित्र समजल्या जाणाऱ्या जलाचे सिंचन करुनही नव्हे. तर संबोधि प्राप्तीसाठी प्रयत्नशील बनुन, आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो.

या परिमंडलाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती, परिशुद्धतेची कमलदले उमलोत.

या परिमंडला भोवती, या पवित्र क्षेत्राभोवती दृढ प्रज्ञेचा वज्रतट उभा राहो.

या पवित्र क्षेत्राभोवती, संसाराचे निर्वाणात परिवर्तन करणाऱ्या अग्निज्वाला उफाळोत.

येथे बसुन, येथे आचरण करुन, आमची मने प्रबुद्ध बनोत. आमचे विचार धम्म बनो, आणि आमचे परस्परातील संबंध संघ बनोत. 

सर्व प्राणिमात्रांच्या सुखासाठी आणि सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी, काया, वाचा आणि मनाने आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो..




ह्या वंदने प्रमाणे विहारासंबंधीची भावना जेव्हा बौद्धजनांच्या मनात रुजेल,, तेव्हा प्रबुद्ध भारताची सोनेरी सुरुवात होईल....




जयंती उत्सव समीतीच्या ऐवजी धम्म प्रचार केंद्रांची निर्मीती होणे गरजेचे आहे.



यावर्षी आमच्या शहरात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती' नावाची एक समिती निर्माण झाली आहे. ह्या समितीचे प्रायोजन काय तर दरवर्षी लक्षावधी रुपये खर्च करुन आंबेडकर जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरे करणे. याला काय म्हणावे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 'केवळ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचे काम आहे ते करा.'


खरच.. आपण उत्सव प्रेमी झालो आहोत, आंबेडकर जयंती आली प्या दारु, नाचा डीजे समोर,, ह्याला म्हणाल काय आंबेडकरवाद्यांची जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धत? ही असली पद्धत बाबासाहेबांच्या विचारांशी जुळते काय? हे सर्व प्रश्न आधी आपल्या मनाला विचारुन पहा. मग मी तुम्हाला विचारतो कि, अशा समितींची गरजच काय? त्यापेक्षा अशा प्रकारे जो पैसा खर्च होतो, तो धम्मप्रचाराच्या कार्यात लावु शकत नाही का आपण ? म्हणुन अशा समित्यांपेक्षा धम्म प्रचार केंद्रांच्या निर्मिती ची आवश्यकता नाही काय?




बावीस प्रतिज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे.... एका आदर्श बौद्ध संस्कृतीची निर्मिती करा...


आज आपल्या समाजासमोर सर्वात मोठे आव्हान पुढे ठाकले आहे ते,, सर्वच्या सर्व २२ प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करण्याचे. आज धम्मचकरप्रवर्तनाच्या इतक्या वर्षांनंतरही आपण त्या अमलांत आणु शकलो नाही. आजही कित्येक लोक आपल्या जुन्या धर्मातील रुढी परंपरांना चिकटुन आहेत,, कित्येक देवीदेवतांचे नवस ते करतात, तर काही लोक फक्त २२ प्रतिज्ञांचे पालन करा म्हणुन ओरडुन सांगतात, पण स्वतः मात्र करत नाही, सांगायचे तात्पर्य हे कि,, २२ प्रतिज्ञा म्हणजे हिंदु द्वेष करणे नव्हे,, तर आपला जुना धर्म त्यागुन नव्या बुद्धाच्या संघात सामील होणे. जेव्हा तुम्ही जुना धर्म त्यागण्याची प्रतिज्ञा करता त्याचसोबत तुम्ही नवा बुद्ध धर्म स्वीकारण्याचीसुद्धा प्रतिज्ञा करता. त्यामुळे बुद्धाचा धर्म तुम्हाला कोणाचाही द्वेष करण्याची परवानगी देत नाही. मग असे तुम्ही का करता.? याचा अर्थ असा कि, तुम्ही हिंदु धर्म त्यागला आहे, पण नवा धर्म स्वीकारला नाही. मग तो केव्हा स्वीकारणार? जर आपण २२ प्रतिज्ञांचे पालन पुर्णपणे करु शकलो तर आपल्या जुन्या धर्माच्या रुढी व परंपरांचा त्याग करु शकु व बौद्ध धर्माच्या आदर्श जीवनप्रणालीने जीवन जगुन आपल्या समाजात एक आदर्श बौद्ध संस्कृती निर्माण करु शकु.....




उठा, जागृत व्हा, अजागृत राहु नका, सैद्धांतिक (धम्मा प्रमाणे) जीवन जगा. दुर्गुणांनी राहु नका. सदाचाराने राहणारे सगळीकडे सुखी राहतात...



दीक्षाभुमी, नागपुर येथे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सविस्तर भाषणात म्हणाले होते कि,,,


बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठीच शोधली आहेत यातील जवाहिरांचा मुक्त वापर करा.

मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडके अडकवुन घेत आहोत असे मानु नका. बौद्धधर्माच्या दृष्टीने भारताची भुमी सध्या शुन्यवत आहे. आपण महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीला आणला असे होवु नये, म्हणुन आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करु. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे....



पण आज तुम्ही तो निंदाजनक स्थितीत आणुन ठेवला आहे...


भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला आहे, म्हणजे बुद्धाचे अनुयायी हे दुःखमुक्त असतात,, पण जर तुम्ही स्वतःला बौद्ध आहोत असे समजुन मोठा होरा मिरवता ना.. मग तुम्ही दुःखमुक्त आहात काय? मला सांगा तुमच्यापैकी किती लोक पंचशीलांचे पालन करतात? किती लोक सदाचारी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात?



तथागतांना वयाच्या पस्तीसाव्या वर्षी वैशाख पोर्णीमेला ज्ञान प्राप्ती झाली आणि आषाढ पोर्णीमेला त्यांनी संघाची स्थापना केली. आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे सुमारे पंचेचाळीस वर्षे त्यांनी धम्मप्रचार केला, आणि अवघ्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी कित्येक राजा महाराजांना, श्रीमंतांना, उडाणटप्पुंना, डाकुंना, नगरवधुंना धम्मदीक्षा दिली... पण ह्या ५७-६० वर्षांच्या काळात आपण धम्माचा किती प्रमाणात प्रचार आणि प्रसार करु शकलो? बौद्धमय भारत नावाची बाबासाहेबांनी उभी केलेली चळवळ कोणत्या मार्गाने चालली आहे, याची जाणीव आपल्याला आहे काय? हि सर्व सध्या बौद्ध समाजापुढे असलेली आव्हाने आहेत,, आपल्या अशा वागण्यामुळेच धम्माला ग्लानी येत आहे.... त्यावर त्वरीत उपाय योजायला हवेत, अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली हि चळवळ बेशुद्ध व्हायला जास्त वेळ लागणार नाही.



भगवान बुद्धांची शिकवण आचरणात आणा,, आपला धर्म (आचरण) शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. भगवान बुद्धांच्या धम्मानुसार वागले तर आपण नक्कीच दुःखमुक्त होणार यात तीळमात्र शंका नाही...
धम्मपदाच्या चतुर सिद्धांतांनुसार वागा आणि आपले आयुष्य दुःखमुक्त करा.....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :


मराठी धम्मपद

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे :भाग १

भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक......

बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा