शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदितब्बो विञ्ञुही ति



भगवंताने ज्या श्रेष्ठ धम्माचा उपदेश केला आहे, त्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते. कालांतराने नाही, तर जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाद्वारे कोणत्याही शीलवंताला आणि प्रज्ञावंताला अनुभवुन पाहता येते.



आपण धम्म वंदनेची सुरुवात करताना म्हणतो,, स्वाखातो भगवता धम्मो.... यातील भगवता शब्दाचा अर्थ होतो भगवान गौतम बुद्ध, आणि बुद्ध भगवंताद्वारा उपदेशिलेला धम्म. परंतु बुद्ध या शब्दाचा अर्थ काय होतो हा प्रश्न पडने स्वाभावीक आहे. बुद्ध म्हणजे ज्याने बुद्धत्वाची प्राप्ती केली आहे, असा असामान्य मानव, एक प्रबुद्ध मानव तो कोणी ईश्वर नव्हे, त्याचा पुत्र अवतार किंवा प्रेषितही नव्हे.


बुद्धत्वामध्ये अनंत गुण समाविष्ट आहेत, त्याच्यात सर्वोच्च शुद्धता आहे, त्याच्या ह्रदयात सर्व प्राणिमात्रांच्या प्रती असीम करुणा आहे, आणि या करुणेनेच तो प्रबुद्ध मानव जे काही बोलतो त्याला धम्म असे म्हणतात, लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य आहे. धम्म म्हणजे दोन मनुष्यांतील संवाद आहेत, जो एक मनुष्य दुसऱ्याला जीवनात प्रोत्साहीत करतो, त्याला धम्म शिकवतो. असा कोणी ईश्वर अस्तित्वात नाही जो मनुष्याला मदत करण्यासाठी स्वर्गातुन पृथ्वीवर येतो.


भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश श्रेष्ठ पद्धतीने केला आहे. याचा अर्थ बुद्ध मनुष्य प्राण्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या गरजा, त्यांच्या मनाच्या अवस्था बुद्धाला माहीत आहेत, त्यांना कशा प्रकारे मदत करायची हे देखील बुद्धाला माहीत आहे. आपल्या धम्माचा उपदेश करताना कधी कधी ते सुर्य, चंद्र, पशू, पक्षी, फुलांचे सुंदर उदाहरण देतात, तर कधी गोष्टी सांगतात. कारण काही लोकांना गोष्टी द्वारे केलेला उपदेश लवकर समजतो. जेव्हाआपण बुद्धाच्या धम्माचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या देशात जातो. तेव्हा आपल्याला समजते कि, वेगवेगळ्या देशांतील संस्कृती वेगवेगळ्या आहेत तरी प्रत्येक प्रदेशांतील लोकांना गोष्टी ऐकायला आवडतात, तर काहींना व्याख्यान आवडते. भगवान बुद्ध प्रत्येक प्रकारच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे उपदेश करत होते. कारण त्यातील संदेश प्रत्येकाला कळुन यावा. त्यामुळे आम्ही म्हणतो कि, भगवान बुद्धांचा धम्म स्वाखातो आहे.




एकदा भगवान बुद्धांचे दोन शिष्य (ज्यांचा जन्म वैदिक कुळात झाला होता) ते भगवान बुद्धांजवळ आले आणि त्यांना म्हणाले कि 'कृपा करुन आम्हाला तथागतांचा उपदेश सुंदर, सुसंस्कृत आणि सभ्य संस्कृत भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचविण्याची परवानगी द्या'. तेव्हा भगवान म्हणाले, 'नाही माझा धम्म प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत शिकु द्या. यामुळे तुम्ही संस्कृत बोलता तर तुम्ही संस्कृत भाषेत धम्म शिका, जर तुमची भाषा पाली (मागधी) असेल तर तुम्ही पाली मध्ये धम्म शिका, हे धम्माचे तत्वज्ञान आहे, त्याला भाषेमध्ये बांधुन ठेवु नका, धम्माची कोणती एक भाषा नाही. याप्रकारे बुद्धाचा धम्म ज्या ज्या प्रदेशात गेला त्या त्या प्रदेशात त्याच्या धम्माचे अनुवाद स्थानिक भाषेत झाले. काही धर्मांमध्ये त्यांचा स्वतःचा एक पुरोहीत असतो, ज्यांची स्वतःची एक पवित्र भाषा असते. आणि त्यामुळे त्यांचा धर्म ग्रंथ काहीच व्यक्तींसाठी सीमित असतो, पण बुद्धांच्या उपदेशांबाबत असे नाही आहे. त्यांच्या उपदेशांचा ज्याप्रमाणे जमेल तितका प्रचार करायला हवा. यामुळेच बुद्धाचा धम्म स्वाखातो आहे, योग्य प्रकारे शिकवला आहे. त्यामुळे आपण जेव्हा केव्हा स्वाखातो भगवता धम्मो असे म्हणतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी मनात आणायला हव्यात.



बुद्ध भगवंतांनी ज्या सर्वश्रेष्ठ धम्माचा उपदेश केला आहे तो संदिट्ठिको आहे. याचा अर्थ असा होतो कि जर तुम्ही बुद्धाच्या धम्मानुसार आचरण कराल त्याचे फळ तुम्हाला ताबडतोब मिळेल. काही धर्म असे सांगतात कि जर तुम्ही आमचा धर्म स्वीकाराल आणि त्याच्यानुसार पुण्यकर्म कराल तर मृत्युनंतर स्वर्गात जागा मिळेल. किंवा काही सांगतात कि दुसऱ्या जन्मात श्रेष्ठत्व प्राप्त होईल. म्हणजे त्याचे फळ मेल्यानंतर मिळते. परंतु धम्मानुसार तुम्ही आपल्या जीवनात धम्माचरण कराल तर त्याचे फळ ताबडतोब मिळेल. त्यासाठी दुसऱ्या जन्माची वाट बघत राहण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाल धम्माचे फळ मिळत नसेल तर याचा अर्थ असा कि तुम्ही धम्माचरण करत नाही. बुद्धाच्या धम्माचे फळ ताबडतोब मिळते म्हणजे दररोज केवळ 'बुद्धं सरणं गच्छामि' म्हटल्यावर तुम्हाला धम्माचे फळ मिळेल असा अर्थ कोणी काढु नये. त्यासाठी तुम्हाला आर्य शीलाचरण, आर्य धम्माचरण करावे लागेल. बुद्धाच्या धम्माचे आपल्या जीवनात श्रेष्ठ आचरण करावे लागेल, योग्य धम्मचर्या करावी लागेल तेव्हाच त्याचे परिणाम आपल्या जीवनात लगेच दिसु लागेल. यामुळे बुद्धाचा धम्म संदिट्ठिको आहे.



भगवान बुद्धांनी ज्या श्रेष्ठ सद्धम्माचा उपदेश तो धम्म अकालिको आहे, म्हणजे त्याचा काळाशी काहीही संबंध नाही आहे, भगवान बुद्धांची शिकवण आणि सिद्धांत आधुनिक, बुद्धीसुसंगत आणि सदासमकालीन आहेत. त्याचा काळाशी काहीही संबंध नाही. सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी ज्या धम्माची शिकवण दिली होती, त्या काळात त्याचे आचरण करत होते त्याचा परिणाम अगदी तोच आजही मिळतो,, लक्ष, दशलक्ष वर्षांनंतरही तोच मिळणार. ज्या धम्मालाकाळाची मर्यादा नाही तो अकालिको आहे, तो विश्वव्यापी आहे, त्याला विशिष्ट प्रदेशाचीही मर्यादा नाही. कोणत्या विशिष्ट देशात जाऊन रहाण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही जिथे कुठेही जाणार इंग्लंड किंवा भारत, फिनलॅंड किंवा न्युजीलॅंड, जर्मनी किंवा अमेरिका तिथे तिथे तुम्ही बघाल कि, तेथील संस्कृती भिन्न असेल, परंपरा भिन्न असतील परंतु धम्म हा एकाच प्रकारचा असेल. कारण प्रत्येक प्रदेशातील मानवाचा ह्रदय एकसारखेच असते, मग तो मनुष्य पुर्वेकडील राहणारा असो कि पश्चीमेकडील, उत्तरेकडील अथवा दक्षीणेकडील त्याने काहीही फरक पडत नाही. त्यामुळे एकाच प्रकारच्या धम्माचे आचरण कोणत्याही प्रदेशाची मर्यादा नाही. परंतु जगात असे काही धर्म आहेत कि त्यांना विशिष्ट प्रदेशाची मर्यादा आहे, ज्या धर्मांचे पालन आपण केवळ विशिष्ट राष्ट्रांत करु शकतो.... समजा आपल्याल्या एखाद्या विशिष्ट कार्यासाठी गंगेचे पाणी हवे असेल तर ते आपल्याला गंगेतुनच मिळणार. जर तुम्ही इंग्लंड मध्ये राहत असाल तर एखाद्या बॉटलमध्ये गंगेचे पाणी भरुन इंग्लंडला न्यावे लागेल. त्यामुळे विदेशातील लोकांचे जीवन खुप कष्टमय होते. त्यामुळे काही धर्मांना विशिष्ट प्रदेशांची मर्यादा आहे, ते विश्वव्यापी नाहीत. परंतु बुद्धाचा धम्म विश्वव्यापी आहे. त्याचे आचरण आपण कुठेही करु शकतो. अगदी धृवपदांवर कोणी व्यक्ती राहत असेल तर तो धृवावर सुद्धा बौद्ध धम्माचे आचरण करु शकेल. तिबेटमध्ये प्रत्येक वस्तु बर्फाच्छादित आहे, परंतु तिथेही धम्माचरण केले जाते. इंग्लंडमध्येही हजारो लोक धम्माचरण करतात, ते कुठले लोक आहेत, कोणत्या प्रदेशातील आहेत याने काहीच फरक पडत नाही. कारण बुद्धाचा धम्म अकालिको आणि विश्वव्यापी आहे.




भगवान बुद्धांचा धम्म एहिपस्सीको आहे, एहि म्हणजे या आणि पस्सिको म्हणजे पहा. याप्रकारे एहिपस्सीको चा अर्थ होतो या आणि पहा.. बुद्धांचा धम्म हा असा धम्म आहे जो म्हणतो या स्वतः पहा, स्वतः जाणा त्याचे अंधानुकरण करु नका, केवळ पवित्र धम्मग्रंथांत लिहिली आहे म्हणुन ते सत्य मानु नका, कोणत्या धर्मगुरूने म्हटले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. ह्या विश्वात आजकाल अनेक धर्मगुरू निर्माण झाले आहेत, केवळ भारतातच नव्हे तर इंग्लॅंड, अमेरिका, आदी राष्ट्रांत त्यापैकी अनेक आपल्या जेट विमानातुन विश्वाचे भ्रमण करत असतात. ते जगाचे इतके चक्कर मारतात कि, त्यांना चक्कर का येत नाही याचे आश्चर्य होते. त्यांच्यापैकी अनेक लोक सांगतात कि आम्ही ईश्वराचे दुत आहोत, आम्ही प्रत्येक गोष्ट जाणतो, आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरे आहेत कारण आम्ही ईश्वराचे अवतार, त्याचे दुत, त्याचे पुत्र ,आदी आहोत. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा, आमचे भक्त बना, आम्ही जे काही सांगतो त्याप्रमाणे वागा त्यानंतर तुमचे कल्याण होईल. माझी पुजा करा, माझी प्रार्थना करा, मी तुम्हाला सुरक्षीत ठेवीन. जगातील अनेक धर्मसंस्थापक सुद्धा हेच सांगतात. त्यांच्यातील अनेकांना शिष्य मिळतात, परंतु ते संभ्रमीत असतात, घाबरलेले असतात, दुर्बल असतात. त्यांना वाटते कि ईश्वर येईल आणि आमचे रक्षण करील. परंतु बुद्धाच्या धम्मात याप्रकारचे काहीच नाही. भगवान बुद्धांनी सांगितले कि मी एक मानव आहे. मी एक विशेष अनुभव केला आहे. त्यामुळे मी जे काही सांगतो ते लक्ष देवुन ऐका, तुमच्या बुद्धीच्या तर्कावर त्याची समीक्षा करा, त्या पारखा,, ज्याप्रमाणे सोनार, सोन्याला अग्नीत टाकुन पारखतो, त्याचप्रमाणे तुम्ही माझे शब्द पारखा.. आजपर्यंत झालेल्या कोणत्याच धर्मसंस्थापकाने हे साहस केले नाही, उलट ते म्हणतात कि माझ्यावर विश्वास ठेवा, मीच सत्य आहे, मी तुम्हाला पापमुक्त करेन, मेल्यानंतर स्वर्गात जागा देईन. मी तुमच्यासाठी विचार करेन, तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही माझी पुजा करा, माझी प्रार्थना करा, आणि लोकही त्यांचे अंधभक्त बनतात, हे असले अ-धर्म मानवाच्या प्रगतीस हानीकारक आहेत, हे खुप दुर्भाग्यपुर्ण आहे, कारण लोक मोठ्या श्रद्धेने हे करत असतात. परंतु चुकीच्या उपदेशाने लोकं स्वावलंबी बनण्याऐवजी ईश्वरावर परावलंबी बनुन अंधविश्वासाच्या खोल दरीत दिवसेंदिवस जातात. परंतु बुद्धाचा धम्म निराळा आहे, तो एहीपस्सीको आहे, तो म्हणतो या आणि स्वतः पहा, स्वतः जाणा..



भगवान बुद्धांचा धम्म ओपनायिको आहे,,, ओपनायको म्हणजे पुढे जाणारा,, म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म प्रगतीशील आहे, तो मानवाच्या व्यक्तीत्वाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, तो मानवाच्या मनुष्यत्वाला उच्च स्तरावर नेतो. भगवान बुद्धांचे उपदेश आम्हाला मनुष्यत्वापासुन,, प्रबुद्धत्वाकडे नेतात, ते आम्हाला सुखी बनवतात, ते आम्हाला प्रज्ञावंत बनवतात, ते आम्हाला करूणा शिकवतात ते आम्हाला सन्मार्गावर नेतात. यामुळे आम्ही म्हणतो कि, भगवान बुद्धांचा धम्म ओपनायिको आहे,,,




शेवटी आम्ही म्हणतो कि बुद्धाचा धम्म पच्चतं वेदितब्बो विञ्ञुहिती आहे. अर्थात बुद्धाचा धम्म कोणत्याही आधुनीक, बुद्धीप्रामाण्यवादी, समजदार व्यक्तीला समजु शकतो. भगवान बुद्धाचा धम्म हा काही कोरा दार्शनिक सिद्धांत नव्हे. तर सम्यक संबुद्धाची ती प्रत्यक्ष अनुभुती आहे. कोणी त्याचा अनुभव घ्यावा. हा धम्म स्वतः अनुभव करण्यासाठी आहे, इकडुन ऐकुन तिकडे सांगण्यासाठी नाही आहे. आपल्याला त्याचा स्वतः अनुभव घ्यावा लागतो. दुसरा कोणीही आपल्यासाठी काहीच करु शकत नाही. आपणच आपल्यासाठी काही करु शकतो. आपण कोणत्या ईश्वराला, त्याच्या अवतारा अथवा त्याच्या दुताला आपली मदत करण्यासाठी बोलवु शकत नाही. अगदी भगवान बुद्धालाही नाही, तुम्हालाच प्रयत्न करायचा आहे, तथागत तर केवळ मार्गदर्शक आहेत. ते आपल्याला केवळ मार्ग दाखवतात. आणि आपल्याला त्या मार्गावर जायचे आहे. तथागत मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाहीत, ते आमचे अतुलनीय शिक्षक आहेत. यासाठी वास्तवात धम्म काय आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर त्याचा अनुभव घ्यावा. केवळ हे म्हटल्याने जास्त काही फरक पडणार नाही. जेव्हा आपण ते आचरणात आणु शकलो तेव्हाच आपण खरे बुद्धीस्ट बनु शकतो....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




Read Also :

१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

७. श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद(राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

८. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे :
भाग १


९. भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक......


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा