बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

रोहीणीचे वडील म्हणाले,,

तु झोपताना श्रमणाचे नाव घेतेस,
उठताना श्रमणाचे नाव घेतेस,
तु केवळ श्रमणांची पुजा करतेस,
तु श्रमण बनणार, यात आता काहीही संदेह नाही....


तु नाना प्रकारची पक्वाने आणि द्रव्ये श्रमणांना दान करतेस... माझ्या प्रिय मुली, मि तुला विचारतो हे सर्व तु कशासाठी करतेस..?

ते श्रमण आळशी आहेत, ते कोणतेही श्रम न करता केवळ फुकटचे खातात. तरीसुद्धा त्यांचा एवढा आदरसत्कार का करतेस तु रोहीणी?



रोहीणी म्हणाली,,

बाबा खुप वर्षांपुर्वी तुम्ही मला श्रमणांबद्दल प्रश्न विचारला होता, कि मी श्रमणांचा एवढा आदर सत्कार का करते.?


मी श्रमाणांच्या दुर दृष्टीला पुजते, त्यांच्यातील योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या सामर्थ्याला पुजते, त्यांच्या नीतियुक्त धर्माचरणाने, त्यांच्यातील नैतिकतेने, सद्गुणांनी, सदाचाराने, कर्तव्यपारायणतेने मी प्रभावित झाले. या सर्व गुणांची मी पुजा करते.


श्रमण हे आळशी नाहीत तर कष्टाळु आहेत.

ते उत्तम कार्य करतात. त्यांनी राग, लोभ, द्वेष, तृष्णा आदि गोष्टींचा त्याग केला आहे.
यामुळे मी श्रमणांचा आदरसत्कार करते.


ते वाईट विचारांपासुन मुक्त झाले आहेत, त्यांचे आचरण शुद्ध आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या वाईट विचारांचा त्याग केला आहे, त्यामुळेच मी श्रमणांचा आदर सत्कार करते.


त्यांच्या शारीरीक क्रिया किती शुद्ध आहेत, त्यांची वाणी किती शुद्ध आहे.. त्यांचे मन किती शुद्ध आहे. ते मोत्यांप्रमाणे निष्कलंक आहेत, त्यांचे गुण निर्दोष आहेत. त्यांची शिकवण उत्कृष्ट आहे, त्यांचा धम्ममार्ग उत्कृष्ट आहे, ते आम्हाला जीवनाचे ध्येय सांगतात, ते आर्य सदाचारी आहेत. त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.



ते धम्मामध्ये जगतात, ते धम्मामध्ये राहतात, त्या आर्यांचे मन एकरुप आहे, त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.


ते सावधतेने प्रवास करतात, श्रेष्ठ उपदेश करणारे, सत्य आणि असत्य यांच्यातील भेद जाणनारे ते आर्य दुःखमुक्त आहेत, आणि दुसऱ्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आहेत, म्हणुन मी त्यांचा आदर सत्कार करते.



जेव्हा ते एखादा गाव सोडतात, त्यावेळी ते कशालाही मागे वळुन बघत नाही. किती चिंतामुक्त आहेत ते श्रमण.! यामुळे सुखी देवांचा मी आदर सत्कार करते.


ते कोठारात किंवा मडक्यात धान्य साठवुन ठेवत नाहीत, ते फक्त त्यांच्या पोटापुरतेच अन्न मागतात, यामुळे त्या आर्यांचा मी आदर सत्कार करते.


ते सोन्या चांदीची भेट स्वीकारत नाहीत, नाही कोणाकडे पैशांची मागणी करत. ते तृष्णामुक्त वर्तमानात जगतात, यामुळे त्या श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


ते वेगवेगळ्या कुटुंबातुन, वेगवेगळ्या जातीतुन, वेगवेगळ्या राष्ट्रांतुन संघात आले आहेत, परंतु तरीसुद्धा एकमेकांशी ते किती प्रेमाने आणि बंधुभावाने राहतात, यामुळे त्यांच्यातील करूणेच्या नात्याला मी वंदन करते,, आणि त्या सदाचारी आर्य श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


रोहीणीचे वडील म्हणाले,,

रोहीणी बाळा, होय खरोखरचं... आमच्या सुखासाठी आणि हितासाठी तु आमच्या कुटुंबात जन्म घेतला आहेस. तु मला प्रभावित केलेस... माझ्या मनात भगवान बुद्धांबद्दल, त्यांच्या धम्माबद्दल आणि संघाबद्दल आदराची भावना वाढीला लावलीस त्याबद्दल तुझे खुप खुप आभार...


ते खऱ्या त्यागाचे मुर्तीमंत प्रतीक आहेत. ते दान देण्यास योग्य आहेत. हे श्रमण आम्ही भेट दिलेले दान स्वीकारतील,



रोहीणी म्हणाली,,

जर आपण वेदनांना घाबरत असाल, तुम्हाला होणाऱ्या वेदना असहय्य झाल्या असतील. तेव्हा बुद्धाला शरण जा.. धम्माला शरण जा.. संघाला शरण जा.. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करा, जेव्हा तुम्ही श्रेष्ठ व सदाचारी पुरुष बनाल, तेव्हा संपुर्ण वेदनामुक्त आणि दुःखमुक्त व्हाल...


रोहीणीचे वडील म्हणाले,,


मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करतो.


पुर्वी मी एका ब्राह्मणाचा नातेवाईक होतो, आज स्वतः खऱ्या अर्थाने एक ब्राह्मण बनलो..



ज्याच्या ठाई पुर्वी अनास्था होती, तो आता आस्था दाखवु लागतो, जो आपले पुर्वजीवन सद्गुणांनी झाकुन टाकतो आणि आपल्या तारुण्यात बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, तो वादळातुन मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व जगाला प्रकाशीत करतो..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा