रविवार, २२ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे (भाग २ : राजा प्रसेनजीत आणि भगवान बुद्ध - २)

मागील प्रकरण वाचण्यासाठी क्लिक करा....



राजा अजातशत्रु आणि प्रसेनजीतमधील युद्ध


मागील लेखामध्ये सांगीतल्याप्रमाणे अजातशत्रु हा प्रसेनजीतचा भाचा होता. अजातशत्रु हा देवदत्ताचा प्रभावाखाली होता, आणि अजातशत्रुचा पिता राजा बिंबीसार हा बुद्धाचा उपासक असल्यामुळे देवदत्ताने अजातशत्रुचे कान भरले व अजातशत्रुने बिंबीसाराला बंदी बनवले तिथेच त्याचे निधम झाले हि बातमी कळताच बिंबीसाराची पत्नी व प्रसेनजीतची बहीण हिनेसुद्धा प्राण सोडले. पुढे अजातशत्रुने प्रसेनजीत विरुद्ध दोघांचेही युद्ध सुरु झाले आणि प्रसेनजीतचा पराभव झाला आणि तो आपली राजधानी श्रावस्ती येथे परतला. हे वर्तमान भगवंतांना कळताच भगवान म्हणाले,,



भिक्खुहो, मगध राजा अजातशत्रु म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे, याउलट राजा प्रसेनजीत हा जगातील चांगुलपणाचा मित्र. सध्यातरी प्रसेनजीतला पराभुत मनुष्य म्हणुन दुःखामध्ये रात्र काढावी लागणार आहे.





• विजयातुन द्वेष जन्मास येतो., जिंकणाऱ्याला दुःखात काळ कंठावा लागतो.

• परंतु जो शांत व क्रोधविरहीत आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसाच्या गावी जय पराजयाची वार्ताच नसते...




आपला पराभव लक्षात ठेऊन प्रसेनजीतने अजातशत्रुवर स्वारी केली आणि त्याचा पराभव करुन त्याला जीवंत पकडले, तेव्हा प्रसेनजीतने स्वतःशीच विचार केला कि, मी याच्या वाटेला गेलो नव्हतो, हा माझा नातेवाएक असुनसुद्धा मला त्रास देतो, आता मी याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ आदि ताब्यात घेऊन त्याला सोडुन दिले तर ..? आणि प्रसेनजीतने तसेच केले.


हे वर्तमान भगवंतांना कळताच भगवान म्हणाले,


• माणुस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांदा लुटण्याची इर्षा धरतो.


• हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणी तरी भेटतोच. जेत्याला कोणीतरी हरवतोच. निंदकाला निंदक सापडतो.

• अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्यांना लुटतो त्यावरही स्वतःला लुटल्या जाण्याची पाळी हि येतेच...


• पुढे प्रसेनजीतने आपली मुलगी वजीरा हिचे लग्न अजातशत्रुसोबत लावुन दिले. आणि त्याच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले...



मुलापेक्षा मुलगी बरी..!


एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनात राहत असताना कोसलराजा प्रसेनजीत धम्म जाणुन घेण्यासाठी भगवंतांजवळ आला. राजा भगवंतांसोबत बोलत असताना, राजवाड्यातुन एक दूत आला आणि राजाजवळ जाऊन त्याची राणी प्रसुत होऊन तिला मुलगी झाल्याचे त्याला कळले. हि बातमी ऐकुन राजा खुप दुःखी झाला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले असता प्रसेनजीत म्हणाला,, आत्ताच माझी पत्नी मल्लिका प्रसुत झाली, आणि मला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे कळले त्यामुळे मी दुःखी आहे.

यावर भगवंत म्हणाले,, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली आहे, ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी आणि माता अशा विविध भुमीका करणारी आहे. तिच्यापासुन अनेक बोधीसत्त्व आणि चक्रवती जन्म घेतात. त्यामुळे तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करेल, मोठे राज्य करेल. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल...



चार प्रकारचे मनुष्य


एकदा कोसलराजा प्रसेनजीतने भगवंतांना विचारले कि भगवान चार प्रकारचे मनुष्य कोणते..?


भगवान म्हणाले..


१. अंधारातुन अंधाराकडे जाणारा
२. अंधारातुन प्रकाशाकडे जाणारा
३. प्रकाशातुन अंधाराकडे जाणारा 
४. प्रकाशातुन प्रकाशाकडे जाणारा





१. हीन कुळामध्ये जन्मलेला मनुष्य जन्मभर दुष्कृत्ये करतो त्याला मी अंधारातुन अंधाराकडे जाणारा मनुष्य म्हणतो.


२. एखादा मनुष्य हीन कुळामध्ये जन्मतो, खाण्यापिण्याची त्याला टंचाई असते. परंतु काया, वाचा आणि मनाने तो सत्कर्म करतो अशा माणसाला मी अंधाराकडुन प्रकाशाकडे जाणारा म्हणतो.


३. तिसऱ्या प्रकारात एखादा थोर कुळात जन्मतो, त्याला खाण्यापिण्याची टंचाई नसते परंतु काया, वाचा आणि मनाने दुष्कर्म करतो, अशा माणसाला मी प्रकाशातुन अंधाराकडे जाणारा म्हणतो.


४. जो चांगल्या कुळामध्ये जन्म घेतो आणि सर्वकाळ सदाचारी राहतो त्याला मी प्रकाशातुन प्रकाशाकडे जाणारा म्हणतो.






गेल्याचा शोक करणे व्यर्थच....



एकदा प्रसेनजीतची सर्वात आवडती राणी मल्लीका मरण पावली हि बातमी कळताच राजा खुप शोकाकुळ झाला.


हे वर्तमान भगवंतांना समजताच भगवान म्हणाले,, महाराज, जरा धर्मी पदार्थाला जरा येतोच. मरणधर्मी पदार्थाला मरण येतोच, व्याधीधर्मी पदार्थाला व्याधी येतेच., नाशधर्मी पदार्थाचा नाश हा अटळ आहे, त्याला त्याच्यापासुन कोणी अडवु शकणार नाही.


परंतु हे महाराज, अज्ञानी असा विचार करत नाही कि, माझ्याच प्रियजनांना व्याधी, मरण येत नाही, हा सर्व जगाचा धर्म आहे. अज्ञ मनुष्याला असा विचार करता येत नाही त्यामुळे तो शोकाकुळ होतो. त्याचे कामात लक्ष लागत नाही, त्याचे जेवन बरोबर होत नाही., त्यामुळे त्याचे शत्रु आनंदीत होतात. असा मुर्ख मनुष्य आपलीच हानी करुन घेतो परंतु अशावेळेस आर्यश्रावक निर्वाणमार्गाचा लाभ करुन घेतो.






शाक्यांद्वारे फसवणुक....


प्रसेनजीत राजा हा भगवान बुद्धांचा फार मोठा उपासक होता, त्यामुळे त्याने शाक्यकुळातील एखाद्या राजकन्ये सोबत लग्न करण्याची योजना आखली. परंतु शाक्यराजे कोसल राष्ट्राला आणि प्रसेनजीत राजाला नीच मानत होते, त्यामुळे आपली कन्या कोसल राजाला देणे हे शाक्यांना योग्य वाटत नव्हते. तथापि शाक्यांवर कोसल राजाचीच सत्ता असल्यामुळे ते प्रसेनजीत राजाच्या या मागणीला ते नाकारु शकत नव्हते. तेव्हा शाक्यांनी युक्ती केली कि, महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तीया हिला महानामाची स्वतःची कन्या म्हणुन प्रसेनजीतला द्यावी. नंतर कोसल राजा प्रसेनजीतच्या अमात्यांना महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तीया खुप आवडली. जेवनाच्या वेळेस महानाम हा वासभखत्तीयाच्या बाजुला बसल्यामुळे अमात्यांची अशी खात्री झाल्यामुळे त्यांनी कोसल राजा प्रसेनजीतचे लग्न ठरविले. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांचे लग्न झाले. आणि त्याला एक मुलगा झाला. तिचा मुलगा सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या आजोळी शाक्यांकडे गेला. शाक्यांनी त्याचे आपल्या नागमंदिरात योग्य सन्मान केला. परंतु तो तिथुन निघुन गेल्यावर त्याचे आसन धुतले गेले ; आणि आपण दासीपुत्र आहोत हि गोष्ट समजताच तो रागाने लालबुंद झाला. वयात आल्यावर त्याने जबरदस्तीने कोसल देशाचे राज्य बळकावले व वृद्ध प्रसेनजीतला राजवाड्यातुन हाकलुन लावले. त्यामुळे प्रसेनजीत आपला भाचा मगध राजा अजातशत्रुच्या आश्रयाला वेशांतर करुन जाण्यास निघाला परंतु राजगृहाच्या बाहेरील एका धर्मशाळेत तो मरण पावला......


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग २ : राजा प्रसेनजीत ~ १)

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा