शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

भगवान बुद्ध (भाग - १ : जन्मापासुन संबोधीप्राप्ती पर्यंत)

१. ख्रिस्तपुर्व सहाव्या शतकात भारत हा एकसंघ राष्ट्र नव्हता, तो विविध राज्यांमध्ये विभागला होता, त्यांना सोळा महाजनपदे असे म्हणतात.


२. त्यावेळेस शुद्धोधन हा कपिलवस्तुचा राजा होता परंतु कपिलवस्तुवर त्याची सत्ता चालत नव्हती कारण कपिलवस्तुची शासन पद्धती हि गणराज्य पद्धतीची होती.


३. राजा शुद्धोधनाला दोन बायका होत्या. १. महामाया आणि २. महाप्रजापती. महाप्रजापती हि राजाची दुसरी पत्नी असली तरी ती महामायेची मोठी बहीण होती.


४. महामायेने दहा महिने पोटात वाढविल्यानंतर सिद्धार्थाला जन्म दिला, आणि सात दिवसांनीच महामायेचे निधन झाले. त्यानंतर सिद्धार्थाचे पालन पोषण त्याची मावशी महाप्रजापतीने केले.


५. तत्पुर्वी असीत नावाच्या ॠषीने सिद्धार्थाबद्दल भविष्यवाणी केली होती कि हा बालक बुद्ध बनणार..


६. सिद्धार्थाला नंद नावाचा लहान भाऊ होता, नंद हा महाप्रजापतीचा मुलगा होता. याशिवाय सिद्धार्थाला अनेक चुलत भाऊ होते. त्यामध्ये अनुरुद्ध, महानाम, आनंद. तर देवदत्त हा त्याचा आत्येभाऊ होता.


७. वयाच्या आठव्या वर्षापासुन सिद्धार्थाच्या शिक्षणाला सुरुवात झाली. सर्वमित्र हा त्याचा दुसरा गुरू होता. याशिवाय भारद्वाज जो आलारकालामाचा शिष्य होता त्याने सिद्धार्थाला ध्यान साधनेचे शिक्षण दिले.


८. जेव्हा केव्हा सिद्धार्थ आपल्या पित्यासोबत शेतावर जायचा त्यावेळेस तो समाधी अवस्थेत बसायचा.


९. शुद्धोधनाने सिद्धार्थाला बौद्धिक विकासाच्या, क्षत्रीयत्वाच्या सर्व प्रकारचे शिक्षण दिले, सिद्धार्थाच्या अंतकरणात करुणा होती, माणसाला त्रास द्यायला त्याला आवडत नसेल.


१०. वयाच्या सोळाव्या वर्षी यशोधरा हिच्याशी सिद्धार्थाचे लग्न झाले, आणि त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले.


११. वयाच्या वीसव्या वर्षी सिद्धार्थाने शाक्य संघाची दीक्षा घेतली. संघाचा तो एकनिष्ठ सभासद होता. तो संघाचा सभासद झाल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी अशी घटना घडली ज्याने त्याचे आयुष्यच बदलुन गेले. शाक्य राज्याच्या सिमेला कोलीय राज्य होते आणि रोहीणी नदीने त्यांची सीमा निश्चित केली होती आणि या नदीच्या पाण्यावरुन दोन राज्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. आणि शाक्यसंघाने कोलीयांविरुद्ध युद्ध पुकारले, परंतु सिद्धार्थाने मात्र याला विरोध केला.


१२. यावर शिक्षा म्हणुन शाक्य संघाने सिद्धार्थापुढे तीनपैकी एक मार्ग निवडण्याचे सांगीतले. १. युद्धात सामील होणे, २
. देहांत किंवा देशत्याग ३. कुटुंबावर सामाजीक बहिष्कार. यापैकी सिद्धार्थ दुसरा पर्याय निवडतो. आणि देशत्यागाची तयारी करतो. आणि सर्वांचा निरोप घेऊन परिव्राजक होण्यासाठी घरातुन बाहेर पडतो. स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर न झुकवता स्वेच्छेने शिक्षा पत्करणारा तो शाक्य युवक होता...


१३. आपल्या बायको, मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता असा आरोप अनेक अज्ञानी करत असतात परंतु त्यांनी हि गोष्ट ध्यानात ठेवावी कि,, सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते...


१४. गृहत्यागानंतर सिद्धार्थ सर्वप्रथम बिंबीसार राजाची राजधानी राजगृहाकडे जातो. राजगृह कपिलवस्तुपासुन सुमारे चारशे मैल अंतरावर आहे. हा दीर्घ प्रवास सिद्धार्थाने पायीच केला. तेथे त्याची बिंबीसार राजाशी भेट झाली.


१५. त्यानंतर त्याची भेट पाच परिव्राजकांसोबत त्यांची नावे पुढीलप्रमाणे : कौण्डिण्य, अश्वजीत, कश्यप, महानाम, भद्रिक. सिद्धार्थाचे रुप पाहुन ते थक्क झाले.


१६. इकडे कपिलवस्तुमध्ये सिद्धार्थाच्या गृहत्यागाचे पडसाद उमटु लागले. जनता निदर्शने करु लागली, परिणामी शाक्य संघाला परत सभा बोलावुन शांततेची घोषणा करावी लागली. हि गोष्ट सिद्धार्थाला त्या परिव्राजकांकडुन समजली.


१७. आलारकालाम यांची भेट घेण्यासाठी सिद्धार्थाने राजगृह सोडले, वाटेत तो भृगु ॠषींच्या आश्रमात थांबला. तेथे काही काळ थांबल्यानंतर तो आलारकालामच्या निवासाकडे निघाला. आलारकालाम त्यावेळेस वैशालीला राहायचा.


१८. आलारकालामाकडुन सिद्धार्थाने सांख्य तत्त्वज्ञाची तत्त्वे शिकुन घेतली. आलारकालामांनी केलेल्या विवरणामुळे सिद्धार्त गौतम आनंदित झाला.


१९. आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या सिद्धार्थाला ध्यानमार्गाची (समाधी) माहीती घ्यावी असे त्याला वाटले. आलारकालामांनी सिद्धार्थाला ध्यानमार्गाचे तंत्र शिकविले. त्याच्या एकुण सात सिद्धी होत्या.


२०. या ध्यानमार्गाच्या तंत्रानंतर आलारकालामाकडे सिद्धार्थाला शिकविण्यासाठी काहीच नव्हते म्हणुन सिद्धार्थ आलारकालामाचा निरोप घेऊन तिथुन निघुन गेला.


२१. त्याच्यानंतर तो उद्दकरामपुत्र याच्याकडे गेला, उद्दकरामपुत्र हा कोशल राष्ट्रामध्ये समाधीमार्गासाठी प्रसीद्ध होता. उद्दकरामपुत्राने आलारकालामापेक्षा समाधीमार्गातील वरची पायरी शिकवली.


२२. त्यानंतर सिद्धार्थ उरुवेला येथे गेला. उरुवेला म्हणजेच आत्ताचे बुद्ध गया शहर. उरुवेला येथे वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी तो एका ॠषीच्या आश्रमात गेला.


२३. वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी त्याने निरंजना नदीजवळील एकांतातील स्थळ निवडले. राजगृहात भेटलेले ते पाच परिव्राजक, ज्यांनी सिद्धार्थाला शांततेची वार्ता सांगीतली होती. ते देखील वैराग्य मार्गाचा अभ्यास करत होते.


२४. त्यानंतर ते पाच परिव्राजक त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागत होते. आदरभावाने त्याची सेवा करत होते. सिद्धार्थाने वैराग्य मार्गाचा अभ्यास करायला सुरुवात केली.


२५. गौतमाने सुरु केलेली तपश्चर्या व त्यातुन होणारे आत्मक्लेश याचे स्वरुप अतिशय उग्र होते. दररोज तो फक्त एक वाटी अन्नावर जगत असे. कधी कधी तर पंधरवाड्यातुन एकदा अशा अन्नावर तो जगत होता. वैराग्याच्या निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करत तो शरीराला पराकाष्टेच्या यातना देत जगु लागला.


२६. घोर अरण्यात त्याने वस्ती केली होती. तो भाग कोणाच्या अंगाचा थरकाप उडेल इतका भयानक होता. हिवाळ्याच्या कडक थंडीत तो समाधी अवस्थेत न हलता राहायचा, कडक उन्हाळ्यात अंग भाजुन टाकणाऱ्या उन्हात तो राहत असे.


२७. काही दिवसानंतर तांदळाच्या किंवा तिळाच्या एका दाण्यावर तो जगु लागला. अशाप्रकारे आपल्या शरीराला अतिशय कष्ट देत तपश्चर्या करु लागला. त्यामुळे त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते. त्याचे शरीर म्हणजे हाडाचा सापळाच बनला होता. अशी हि तपश्चर्या सहा वर्षे चालली होती.


२८. या यातनांमुळे त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते, इतके कि त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीसुद्धा त्याला प्रकाशाची किरण दिसत नव्हती.


२९. त्यावेळी उरुवेला येथील सुजाता नावाच्या स्त्रीने वटवृक्षाला केलेला नवस फेडण्यासाठी ती वटवृक्षाजवळ जाण्यासाठी निघाली असता, वटवृक्षाखाली गौतमाला बसलेले बघुन जणु काही वृक्ष देवताच अवतरली असे तिला वाटले.


३०. सुजातेने त्याच्यासाठी खीर बनवली व ते सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीजवळ गेला, अंघोळ केली व खीर खाल्ली अशाप्रकारे सिद्धार्थाने वैराग्यमार्ग त्यागला.


३१. तपश्चर्या व आत्मक्लेश यांच्या केलेल्या त्यागामुळे ते पाच परिव्राजक गौतमाला सोडुन गेले.


३२. वैराग्य मार्गाचा त्याग केल्यावर गौतमाने जागा बदलवली तो पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन अवस्थेत बसला. वैशाख पोर्णीमेच्या रात्री बोधीसत्त्व बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रयत्न करतो हे पाहुन माराला अतिशय वाईट वाटले... आणि मार बोधीसत्त्वासोबत युद्ध करण्यासाठी आला. मारासोबत बोधीसत्त्वाचे झालेल्या युद्धाबद्दल वाचण्यासाठी लिंकवर जा...

बोधीसत्व आणि मारामधील युद्ध


३३. माराला युद्धामध्ये पराभुत केल्यावर, मनातील वाईट विचार काढुन टाकल्यावर गौतम पुन्हा ध्यानमग्न अवस्थेत बसला. आणि गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती साठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायऱ्यांनी त्याने संपुर्ण ज्ञानाची प्राप्ती करुन घेतली. आणि बोधीसत्त्व सम्यक संबुद्ध बनला...


क्रमशः

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा