सोमवार, १० मार्च, २०१४

बौद्ध साहित्य परिचय (ग्रंथ नव्हे : संपूर्ण ग्रंथालय)



प्रत्येक धर्माला त्याच्या शिकवणी नुसार एक पवित्र समजले जाणारे पुस्तक असते. ख्रिश्चनांचे बायबल, मुस्लीमांचे कुराण, त्याचप्रमाणे बौद्धांचे त्रिपिटक..! परंतु त्रिपिटक म्हणजे कुराण - बायबल सारखे एखाद्या ग्रंथाचे नाव नसुन ग्रंथालयाचे नाव आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण बौद्धांच्या धर्मग्रंथाबद्दल नव्हे तर बौद्धांच्या धर्मग्रंथालया बद्दल माहिती घेऊया...


भाषेचे पावित्र्य नाही..!



प्रामुख्याने बौद्ध साहित्य आपल्याला पाली आणि बौद्ध मिश्र संस्कृत या भाषेमध्ये सापडते. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि धम्माची स्वतःची अशी एक कोणतीही पवित्र समजली जाणारी भाषा नाही. भगवान बुद्धांचा धर्म प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये शिकण्याची परवानगी स्वतः भगवान गौतम बुद्धांनी दिली आहे, बौद्ध विश्वात हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.


एकदा (उपसंपदेपुर्वी ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले) दोन तरुण भिक्खु एकदा भगवानांजवळ आले, आणि त्यांना म्हणाले, कि आम्हाला भगवानांची शिकवण संस्कृतमध्ये भाषांतर करण्याची परवानगी द्यावी. परंतु भगवान गौतम बुद्धांनी याला सरळ नकार दिला. याच्यामागचे मुख्य कारण म्हणजे संस्कृत हि जनभाषा नव्हती तर देवांची भाषा समजल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेला समजण्याचा आणि शिकण्याचा अधिकार तेवढा तो एखाद्या विशिष्ट वर्गालाच होता. भगवान म्हणाले माझ्या शिकवणीचे संस्कृत मध्ये भाषांतर झाले तर ती केवळ एखाद्या विशिष्ट वर्गा पुरताच मर्यादीत होईल. माझी शिकवण प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेत शिकवण्याचा अधिकार आहे. जेव्हा तुम्हाला संस्कृत येते तेव्हा तुम्ही संस्कृत मध्ये शिका. हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.


आमच्याकडे एक ग्रंथ नाही, संपुर्ण ग्रंथालय आहे.



आज जगात धर्म या नावाने वाढणारे विविध सांप्रदाय आहेत. आणि धर्मग्रंथ म्हणुन ओळखले जाणारे त्यांचे स्वतःचे एक पुस्तकही आहे. यहुदींचे बायबल (जुना करार), इस्लामचे कुरआन, ख्रिस्त्यांचे बायबल (नवा करार), हिंदुंची गीता, वेदिकांचे वेद, शिखांचे गुरु ग्रंथ साहीब, इत्यादी, इत्यादी. या सर्वांचा विचार करता बुद्धाचा धर्म कोणत्या धर्मग्रंथाद्वारे सांगण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.. तेव्हा याचे सरळ आणि सोपे उत्तर म्हणजे बुद्धाच्या धर्माचे धर्मग्रंथ म्हणण्यासारखे एकही पुस्तक नाही तर संपुर्ण ग्रंथालय आहे.


जे त्रिपिटक या नावाने ओळखले जाते ते काही एकच पुस्तक नाही आहे, तर विविध ग्रंथांचा संग्रह आहे. या लेखामध्ये आपण बौद्ध साहित्याची व्याप्ती आणि थोडक्यात परिचय याबद्दल जाणुन घेऊया...


धम्माचे मुळ ग्रंथ त्रिपिटक ती भागात विभागले आहे.


१. विनयपिटक,
२. सुत्तपिटक,
३. अभिधम्मपिटक




१. विनयपिटक : सामान्यतः विनयपिटकामध्ये

(अ) महावग्ग
(ब) चुलवग्ग
(क) पाराजिक
(ड) पाचित्तिय
(इ) परिवार. या पाच ग्रंथांचा समावेश आहे.



२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.

(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :

१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक



३. अभिधम्मपिटक : अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.

१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठान



पाली त्रिपिटकाशिवाय पाली वाङ्मयामध्ये पाली अनुपिटकांचाही समावेश होतो. अनुपिटक म्हणजे त्रिपिटकाच्या रचनेनंतर रचण्यात आलेले साहित्य.

पाली अनुपिटक :
१. नेत्तिपकरण
२. पेटकोपदेश
३. मिलिंद प्रश्न
४. विसुद्धीमग्ग
५. अट्ठकथा
६. टिका

दीपवंस, महावंस, चुळवंस, बुद्धघोसुप्पति, सद्धम्मसंगह, महाबोधिवंस, थूपवंस, गंधवंस, सासनवंस, अनागतवंस, बुद्धालंकार, जिनालंकार, तेलकटाहगाथा, जिनचरित, सद्धम्मोपाय, पञगतिदीपन, सहस्सवत्थुपकरण, इत्यादी ग्रंथांचा समावेश पाली अनुपिटका मध्ये होतो.


पाली त्रिपिटकाची व्याप्ती खुप मोठी आहे, जर आपण त्यांचा संग्रह केला तर ५०० पेक्षा जास्त पानांचे एक खंड अशाप्रकारे ४५ पेक्षा जास्त खंड बनतील. शिवाय त्रिपिटकाच्या अट्ठकथा, टिका यांची व्याप्ती मुळ त्रिपिटकापेक्षाही जास्त आहे.


शिवाय तिबेटियन साहित्याचे ३३७ खंड, चिनी साहित्याचे प्रत्येकी १००० पानांचे १०० खंड. याखेरीज मंगोलीय आणि जपानी साहित्यांचा विचार केल्यावर आपल्याला बौद्ध साहित्याची व्याप्ती किती मोठी आहे याचे अनुमान लावणे कठीणच आहे...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


मराठी धम्मपद

आम्हाला फेसबुकवर Follow करा

भगवान बुद्धांचा भिक्खु संघ

मंगळवार, ४ मार्च, २०१४

भगवान बुद्धांचा संघ ( भाग २ : भिक्खुणी आणि उपासिका संघ)


मागील भागत आपण भगवान गौतम बुद्धांच्या श्रावक भिक्खु संघाबद्दल थोडक्यात माहीती पाहिली. या भागामध्ये आपण भगवान गौतम बुद्धांच्या शासनात असलेल्या श्राविकांच्या भिक्खुणी आणि उपासिका संघाबद्दल माहिती घेऊ या....


भिक्खुणी संघ



१. महाप्रजापती गौतमी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघामध्ये सर्वात जास्त काळ विहार करण्याचा मान महाप्रजापती गौतमी यांना जातो. त्या क्षत्रीय शाक्यांचे महाराज शुद्धोधन यांच्या पत्नी होत्या.


२. खेमा : भगवान बुद्धांच्या भिक्खु संघामध्ये ज्याप्रमाणे धम्मसेनापती सारीपुत्र महाप्रज्ञावानांमध्ये अग्र आहेत, त्याचप्रमाणे भिक्खुणी संघामध्ये खेमा महाप्रज्ञावती श्राविकांमध्ये अग्र आहेत. त्यांचा जन्म मद्रदेशाच्या सिगाल नगरामध्ये झाला. त्या मगधराज बिंबीसार यांच्या पत्नी होत्या.


३. उप्पलवण्णा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघामध्ये सर्वात ॠद्धीमती श्राविकांमध्ये उप्पलवण्णा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील उच्च कुळामध्ये झाला.


४. पटाचारा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील विनयांचे पालन करणाऱ्या श्राविकांमध्ये पटाचारा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील उच्च कुळामध्ये झाला.


५. धम्मदिना : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील धर्म कथन करणाऱ्या श्राविकांमध्ये धम्मदिना अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृहामध्ये झाला.


६. नंदा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील ध्यानी श्राविकांमध्ये नंदा अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय कुळात झाला. नंदा ही महाप्रजापती गौतमी यांची मुलगी होती.


७. सोणा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात प्रयत्नशील असलेल्या श्राविकांमध्ये सोणा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


८. बकुला : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील दिव्य दृष्टी असलेल्या श्राविकांमध्ये बकुला अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


९. भद्दा कुण्डलकेसा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील भगवानांनी उपदेश केलेल्या धर्माचा सर्वात लवकर अनुभव करणाऱ्या श्राविकांमध्ये भद्दा कुण्डलकेसा अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृहामध्ये झाला.


१०. भद्दा कापिलानि : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील पुर्वजन्मांचे स्मरण करणाऱ्या श्राविकांमध्ये भद्दा कापिलानि अग्र आहेत. त्यांचा जन्म मद्रदेशाच्या सालनगरात झाला.


११. भद्दा कचाना : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील श्रेष्ठ प्रज्ञावती श्राविकांमध्ये भद्दा कचाना अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशातील कपिलवस्तू शहरामध्ये झाला.


१२. किसा गोतमी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात रूक्ष चिवर धारण करणाऱ्या श्राविकांमध्ये किसा गोतमी अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


उपासिका संघ



१. सुजाता : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वप्रथम शरण येणाऱ्या उपासिकांमध्ये सुजाता अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील उरुवेला (बुद्धगया) मध्ये झाला.


२. विशाखा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात श्रद्धावती उपासिकांमध्ये विशाखा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


३. खुज्जुत्तरा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात जास्त धम्माचे ज्ञान असणाऱ्या उपासिकांमध्ये खुज्जुत्तरा अग्र आहेत, त्यांचा जन्म वैत्स्य देशाच्या कौशाम्बी शहरात झाला. त्या एका दासीच्या पुत्री होत्या.


४. सामावती : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील मैत्री भावनेत विहार करणाऱ्या उपासिकांमध्ये सामावती अग्र आहेत. त्यांचा जन्म भद्रवती राष्ट्राच्या भद्रिका शहरात झाला.


५. नंदमाता : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील ध्यान करणाऱ्या उपासिकांमध्ये नंदमाता अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशाची राजाधानी राजगृह शहरामध्ये झाला.


६. सुप्रवासा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात आनंददायी श्रद्धावती उपासिकांमध्ये सुप्रवासा अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कुंडीया गावात झाला..


७. सुप्रिया : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील रोगी श्रद्धावती उपासिकांमध्ये सुप्रिया अग्र आहेत. त्यांचा जन्म काशी देशाच्या वाराणसी शहरात झाला.


८. कात्यायनी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील अति प्रसन्न उपासिकांमध्ये कात्यायनी अग्र आहेत त्यांचा जन्म अवंति देशाच्या कुरुरघर शहरात झाला.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



आम्हाला फेसबुकवर Follow करा

भगवान बुद्धांचा भिक्खु संघ

भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे...