गुरुवार, १० मार्च, २०१६

सांप्रदायिक दृष्टीमुळे मनुष्याची शुध्दी होत नाही : भगवान बुध्द..

सांप्रदायिक दृष्टीने जर मनुष्याची शुध्दी झाली असती अथवा त्याच्या ठायी असलेल्या द्न्यानाने तो दुःखाचा त्याग करु लागला तर मग तो सोपाधिक मनुष्य भलत्याच उपायाने शुध्द होतो असे म्हटले पाहिजे...  - भगवान बुध्द, सुत्त निपात..

अनेक लोकांच्या अर्थानुसार त्यांच्या धर्म - संप्रदाय किंवा धर्मग्रंथानुसार सांगितलेल्या गोष्टी ह्याच एकमेव सत्य असतात, आणि त्यांचा जन्म ज्या संप्रदायात झाला तोच श्रेष्ठ बाकीचे हीन, अशी त्यांची दृष्टी बनलेली असते. त्यानुसार आपल्या पंथात सांगीतलेल्या सर्व प्रकारच्या चालीरितींना,  शीलव्रतांना श्रेष्ठ समजून त्यांच्यातच फायदा पाहतात व इतरांना हीन समजतात. 

"आपणच श्रेष्ठ, आपला संप्रदायच सर्वश्रेष्ठ व बाकीचे कनिष्ठ" या न्युनगंडातुन स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करण्याचे प्रयत्न केले जातात, आणि या प्रयत्नातूनच सांप्रदायिक असहिष्णुता निर्माण होते, वेळप्रसंगी दंगली सुध्दा होतात
याची बरीच उदाहरणे आपण आजच्या जगात पाहतच आहोत. सांप्रदायिक बंधनाच्या ह्या दृष्टीचा त्याग करण्यासाठी भगवान बुध्द उपदेश करतात, कारण हि दृष्टी मिथ्या दृष्टी आहे. तुम्ही स्वतःला हिंदू, बाैध्द,  शीख, ख्रीस्ती, जैन किंवा मुस्लीम,  इत्यादी कोणत्याही संप्रदायात बंदिस्त जीव समजू नका, व त्यांचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी एकमेकांशी लढून आपल्यातील मनुष्यत्वाची हत्या करु नका. 

आजकाल अनेक ठिकाणी आपल्यातील बरेच जण जाहीरपणे "मला गर्वच नाही तर माज आहे, *** अमुक अमुक  असल्याचा"  अशा प्रकारचे होते मिरवितांना दिसतात. स्वतःला अमुक अमुक समजणाऱ्या लोकांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि, तुम्ही कोणत्या संप्रदायात जन्म घेतला आहे म्हणून तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही किंवा तो संप्रदाय सुध्दा श्रेष्ठ ठरत नाही, कारण तुम्ही तिथे जन्म घेतला आहे म्हणून. याउलट तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कनिष्ठ समजत असाल तर या बेजबाबदार कृत्यामुळे तुम्हीच हीन ठरता. कारण इतरांना त्याच्या जन्मावरून कनिष्ठ ठरविने हेच हीनपणाचे कृत्य आहे.  म्हणून भगवान बुध्दांनी आपल्या श्रावकांना सांप्रदायिक दृष्टीचा त्याग करण्याचा उपदेश केला आहे, याचे विस्तृत वर्णन सुत्त निपातातील अट्ठक वग्गामध्ये केला आहे.

भगवान बुध्द म्हणतात, सर्व दृष्टीत (पंथात) आपली दृष्टी उत्तम आहे, असे समजून चालणारा जीव या जगात आपल्या पंथाला महत्त्व देतो व त्याहून इतर पंथ हीन आहेत असे म्हणतो, यामुळे ते विवादाच्या पलीकडे जात नाहीत. तो आपल्या पंथातील दृष्टी व श्रृत (ऐकीव) शीलव्रते यांना चिकटून बसतो व इतर सर्व पंथांना हीन समजतो.

असाच एकदा सांप्रदायिक वृत्ती जोपासत भगवान बुध्दांकडे वादविवाद करण्यासाठी आलेल्या प्रशुर नावाच्या परिव्राजकाला भगवान बुध्द म्हणतात, लोक आपल्याच पंथातीत शुध्दी आहे असे प्रतिपादन करतात व इतर पंथातीत शुध्दी नाही असे म्हणतात.  ते वाद करण्याच्या इच्छेने सभेत जाऊन परस्पर परस्परांना मूर्ख ठरवितात. ते अन्यतर पंथातीत बध्द झालेले व आपणास वादात कुशल म्हणविणारे प्रशंसेच्या इच्छेने वादविवाद करतात. सभेमध्ये वादात गुंतला असता प्रशंसेच्या इच्छेने दुसऱ्यावर वाणीचे घाव घालणारा होतो, पण वादात पराजित झाला तर खजील होतो आणि निंदा झाली तर रागावतो. (ही त्याची मिथ्या दृष्टी आहे.) प्रद्न्यावंताने कोणत्याही प्रकारची सांप्रदायिक वृत्ती न जोपासता मी इतरांच्या समान आहे, इतरांहून हीन आहे किंवा श्रेष्ठ आहे अशी तुलना सुध्दा करु नये. कारण जे एखाद्या गोष्टीचा पुरस्कार करीत नाहीत आणि कोणतीही सांप्रदायिकता स्वीकारीत नाहीत अशा ब्राह्मणाला शीलव्रताने धरुन खेचता येत नाही, तो पार गेलेला पुनः परत येत नाही. प्रद्न्यावंताने अशा सांप्रदायिक वादापासुन निवृत्त व्हावे. कारण त्यात निंदा किंवा प्रशंसेच्या शिवाय अन्य काहीही प्राप्त होत नाही. सभेत आपला मुद्दा मांडून तो कधी प्रशंसा पावतो व हर्षीत होतो, आणि त्याला त्याचा गर्व चढतो., पण हा गर्वच त्याच्या घाताचा पाया होय., कारण मनुष्य आपला अहंकार इतरांना दाखवतच असतो. हा प्रकार पाहुन सुद्न्य माणसाने वादात शिरु नये, कारण वादाने शुध्दी होत नाही.

भगवान बुध्द पुढे प्रशुराला म्हणतात, युध्द करायला प्रवृत्त करणारा जो अहंकार आहे, तो माझा पूर्वीच्या नष्ट झालेला आहे. जे सांप्रदायिकतेला पकडून वादविवाद करतात व आपलेच तेवढे सत्य असे प्रतिपादन करतात, त्यांच्याकडे जाऊन तु वाद कर. कारण तु वाद केलास तर प्रतिवादी होऊन उभा राहणारा तुला सापडणार नाही.

पण जे प्रतिपक्षबुध्दी नाहीशी करुन राहतात व आपल्या पंथास्तव दुसऱ्या पंथाशी विरोध करीत नाही व ज्यांना आपलाच पंथ श्रेष्ठ वाटत नाही, त्यांच्याकडे हे प्रशुरा, तुला काय मिळणार...?

वरील उताऱ्यावरून भगवान बुध्दांचा सांप्रदायिक वृत्ती जोपासणाऱ्यांच्या प्रती असलेला दृष्टिकोन स्पष्ट होतो. आजच्या पेक्षा सुध्दा कितीतरी पटींनी अधिक भगवान बुध्दांच्या काळात सुध्दा निरनिराळ्या प्रकारचे पंथ - संप्रदाय अस्तित्वात होते. त्यांच्यातील बरेच मिथ्यादृष्टीयुक्त असल्याने सांप्रदायिक वृत्ती जोपासत होते. संप्रदायामध्ये जी काही शीलव्रते सांगितली आहेत, त्या सर्वांनाच सत्य मानून त्यांनाच चिकटून बसत होते. त्यांच्यानुसार त्यांचा स्वतःचाच संप्रदाय श्रेष्ठ असल्याने व बाकीचे असत्य व हीन असल्याने ते सिध्द करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे वादविवाद करत असत.

अशीच सांप्रदायिक वृत्ती जोपासलेला प्रशुर नावाचा परिव्राजक भगवान बुध्दांच्या कडे आला व त्यांना आपण त्यांच्याशी वाद करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. त्यावर भगवान म्हणाले, लोक आपल्या पंथाला श्रेष्ठ सिध्द करण्यासाठी लोक निष्कारण वादविवाद करतात,  अशा वादविवादांच्या पासून प्रशंसेशिवाय काहीही लाभ होत नाही. याउलट असे वादविवाद करणारा लोकधर्माने विचलित होतो. निंदा झाली तर रागावतो व प्रशंसा झाली तर विचलित होतो. म्हणून प्रद्न्यावान मनुष्य कोणत्याही प्रकारच्या सांप्रदायिकतेचा पुरस्कार करीत नाही, तो स्वतःला श्रेष्ठ व इतरांना हीन समजत नाही. त्यामुळे आपल्या संप्रदायाच्या श्रेष्ठत्वाच्या अहंकारात आंधळा होऊन तो मिथ्या वादविवादात पडत नाही. त्यामुळे भगवान बुध्द हे प्रशुराला तो चुकीच्या ठिकाणी आल्याचे सांगतात. ज्यांच्या सर्व गाठी कापलेल्या आहेत, व कसल्याही प्रकारचा अहंकार शिल्लक नाही, त्यांच्यापाशी प्रशूर परीव्राजकाला काय मिळणार..?

भगवानांच्या वरील उपदेशावरून आपल्याला शिकवण मिळते कि, आपण आपल्या संप्रदायाचा मिथ्या अभिमान बाळगून नये व त्यायोगे आपणच श्रेष्ठ व इतरांना हीन समजु नये. तसेच ह्या गोष्टी सिध्द करण्यासाठी कोणत्याही वादविवादात पडू नये. कारण अशा वादविवादाने शुध्दी होत नाही, हा विशुध्दी चा मार्ग नव्हे तर घाताचा मार्ग आहे.