शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

तुमचा बुध्द आणि आमचा बुध्द (?) (रिकाम्या डोक्यातील नव्या संकल्पना)

           भगवान बुद्धांची धर्मशिकवण जी बुद्धयान म्हणून जाणली जाते, तिचे विविध प्रकारचे अंग आहेत. श्रावकयान, बोधिसत्वयान, प्रत्येकबुद्धयान.. परंतु काही वर्षापासून ज्यांचा धर्माचा विशेष अभ्यासही नाही, असे लोक धर्माला जाणून घेण्याचा प्रयत्नही न करता किंवा त्यामध्ये विशेष ऋची न दाखविता आणि त्यांच्या बद्दल सत्य माहित नसताना, महायान आणि स्थावीरवाद यामध्ये फारक निर्माण करत होते. ज्यापैकी स्थाविरवाद हा बुद्धांचा खरं धर्म तर महायान हा ब्राह्मणांनी विकृत केलेला धर्म, ज्यामध्ये मूर्तीपूजा किंवा अन्य हिंदू पध्दतींनी अतिक्रमण केले होते. या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून स्थाविरवाडी परंपरेचा गौरव आणि तेवढाच महायानाचा अपप्रचार केला जायचा, ज्यामध्ये त्यांना सत्याची मुलभूत माहिती सुध्दा राहत नसायची. परंतु आजकाल ट्रेंड बदलला आहे, सद्यस्थितीत हा भेद स्थाविरवाद विरुध्द महायान असा राहिला नसून काही लोकांनी आपल्या मनातूनच ज्या एका नव्या पंथाची निर्मिती केलेली आहे, ज्याला ते भीमयान किंवा नवयान असे सुद्धा म्हणतात, त्यां नवयान विरुध्द महायान, स्थावीरवाद, वज्रयान किंवा इतर परंपरा यांच्याकडे तो वळविण्यात आलेला आहे. हे लोक मुल पारंपारिक बौध्द धर्म आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौध्द धर्म यांच्यामध्ये विनाकारण भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या अर्थानुसार बाबासाहेबांनी एका नव्या प्रकारच्या बौध्द धर्माची शिकवण दिली, जो केवळ स्वतंत्र्य, समता बंधुता, निरीश्वरवाद, कर्मकांड विरहिता इत्यादींची शिकवण देतो, जो समाधी नाकारतो, डोळे बंद असलेल्या बुध्दाला नाकारतो, पारंपारिक बौध्द धर्माला नाकारतो, इत्यादी त्यांचे म्हणणे असते. पण वास्तवात त्यांच्या आचरणातून यापैकी काही मुल्ये क्वचितच दिसतात, अशाप्रकारचे आरोप करीत असतांना ते कायमच द्वेषयुक्त चित्ताने बोलत असतात, कारण ते धर्माला अजूनही पूर्णपणे समजू शकलेले नाहीत, अर्धे ज्ञान घातक असते ते असेच.


          भारतातील एक विशिष्ट समाज जो भगवान बुध्दांना कायमच विष्णूचा अवतार म्हणून अपप्रचार करीत आलेला आहे, जो आटा बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुद्ध हा मूळ बुध्द नसून त्यांनी स्वतः वेगळ्या विचारातून निर्माण केलेला बुध्द आहे, असा प्रचार सुध्दा करायला लागलेला आहे, त्यांच्यासाठी हे अंतर्गत वाद म्हणजे आयते कोलीतच म्हणावे लागेल. असा काही भेदांमुळे त्या अपप्रचार करणाऱ्या लोकांना तर मूळ बुध्द आणि बाबासाहेबांचा बुद्ध हे दोन्ही वेगळे आहेत आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बुध्दाचा मूळ बुद्धांशी आणि त्यांच्या शिकवनीशी जराही संबंध नाही, असा अपप्रचार करण्याची आयती संधीच आपण देत आहात. बौध्द धर्मातील विविध परंपरांना आणि त्यांच्या अस्तित्वांना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण धर्माला जाणले पाहिजे.


बाबासाहेबांनी स्वीकारलेला धर्म आणि पारंपारिक धर्म यांच्यामध्ये भेद करण्यासाठी पूर्वी महायानाचा अपप्रचार केला गेला, कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता, त्यामध्ये हिंदू धर्माने आणि विशेषतः ब्राह्मणांनी आपल्या धार्मिक परंपरांची - देवी देवतांची कशाप्रकारे घुसखोरी केली, पालीला गरीब बनवून संस्कृत भाषेला कशाप्रकारे प्रकाशात आणले गेले, ति बौध्द धर्माची नसून हिंदू धर्माचीच शाखा आहे, हे सर्व आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे सामान्यजनांत पसराविल्या गेले, सामान्य लोक सुध्दा ह्या विषयावर केवळ विश्वास न ठेवता त्याचा प्रचार सुध्दा करत गेले, म्हणूनच सामान्यजणांत आज जगातील सर्वश्रेष्ठ अशा महायानाची प्रतिमा हि एक कर्मकांडावर आधारीत मार्ग अशीच बनलेली आहे, महायाना नंतर मोर्चा आता पारंपारिक स्थविरवादी मार्गाकडे वळविण्यात आला. यामध्ये स्थाविरवादी परंपरेतील अनेक गोष्टींचा काहीही संबंध नसतांना सुध्दा सुरुवातीला त्यांना महायानाशी जोडले गेले. जसे - विपश्यना, जातक सिद्धांत, इत्यादी . जेणे करून कोणत्याही अभ्यासाविना महायानाला विरोध करणारा वर्ग हा पारंपारिक बौध्द धर्माला सुध्दा विरोध करण्याकडे वळावा. कारण साधारणपणे धर्माचा अभ्यास करणाऱ्या साधकाला हि गोष्ट चांगल्या प्रकारे कळते कि, मूळ पारंपारिक विपश्यनेचा महायानाशी संबंच नसून भगवान बुध्दांनी त्यांच्या श्रावकांसाठी उपदेश केलेल्या श्रावकयानाशी संबंध आहे, ज्यामधील स्थाविरावाद हि शाखा आज अस्तित्वात आहे. पण विपश्यना हि महायांनी लोकांनी बौध्द धर्मात घुसडवली असा आरोप करणाऱ्या लोकांनी कदाचित धर्माचा बेसिक अभ्यास केला नसावा, म्हणूनच ते हा आरोप करीत असावेत असे वाटते.


          सुरुवातीला महायानाच्या बाबतील जनमानसांमध्ये संभ्रम पसरविण्यात यशस्वी ठरलेल्या कंपनीला आता मूळ पारंपारिक धर्माला वेगळे ठरविण्यासाठी त्यातील एकेक गोष्टींचा संबंध महायानासोबत लावावा लागत असून सर्व सामान्य लोकांच्या अचीकीत्सक वृत्तीमुळे ते काही प्रमाणात आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी सुध्दा होतांना दिसत आहेत. अशाप्रकारे बुध्दयानामध्ये भेद निर्माण करू पाहणाऱ्या लोकांसाठी मी माझ्या आगामी पुस्तकामध्ये "बुध्दयान" नावाचे एक स्वतंत्र प्रकारणच लिहिले आहे. पण येथे काही गोष्टी थोडक्यात सांगू इच्छितो :


१. भगवान बुद्धांच्या धर्मपरंपरे मध्ये निर्वाण प्राप्तीसाठी विविध प्रकारचे यान अस्तित्वात आहेत, जे आर्य अष्टांगिक मार्गावरूनच चालतात. महायान, श्रावाकायान इत्यादी जरी वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये अस्तित्वात असले तरी ते दुसऱ्या पंथांद्वारे आचरली जाणारी भगवान बुद्धांची शिकवण चुकीची आहे, म्हणून ते वेगळ्या स्वरूपांमध्ये अस्तित्वात नाहीत, तुमचा पंथ खोटा आणि आमचा पंथ खरं असे मनभेद सुध्दा त्यांच्यामध्ये अस्तित्वात नाहीत. परंतु अर्धवट अभ्यास केलेल्या आपल्यापैकी काहीना त्यांच्यामध्ये भांडण आहे, असा आविष्कार होतो आणि ते तसा प्रचार सुध्दा करू लागतात. परंतु वास्तवात मात्र तसे काहीही नाही. हे सर्व भगवान बुद्धांनी उपदेश केलेलेच धर्म असून निर्वाण नावाच्या शारामध्ये घेऊन जाणाऱ्या विईध यानांच्या स्वरूपामध्ये ते अस्तित्वात आहेत.


२. महायानाच्या बाबतीत जो काही अपप्रचार केला जातो, तो धांदात खोटा असून त्यावर इश्वास ठेवण्यापूर्वी आपण सर्वांनी त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. महायान हा symbolic स्वरूपाचा मार्ग आहे, त्याला समजून घेण्यापूर्वी आपण symbolism ला सुध्दा समजून घेतले पाहिजे. वरवर पाहता सामान्य जणांना तो कर्मकांडावर आधारित धर्माचे वाटतो. पण तसे आही, माझ्या मते तर तो जगातील सर्वात कर्मकांड विरहित श्रेष्ठ असा धर्म आहे, ज्यामध्ये प्रवेश सुध्दा केवळ एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कर्माकांडा द्वारे मिळत नाही, ज्यांना आपण बाप्तिस्मा, सुंता, दिक्षा असे म्हणतो. जेव्हा दुसरीकडे इतर धर्म आपल्याला आमच्या धर्मात प्रवेश करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने देतात, तिथे महायान आपल्याला त्यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी स्वतःची योयाता सिद्ध करायला सांगतो. हा मार्ग गुरु शिष्य परंपरेद्वारा चालतो, त्यामुळे येथे प्रवेश मिळविण्यासाठी आपल्या गुरूकडे एक प्रवेश परिक्षा द्यावी लागते - अर्थात बोधीचीत्ताची निर्मिती. बोधिचित्त हे महायानाचे प्रवेशद्वार आहे, तुमच्याकडे बोधिचित्त असेल तर आपान महायानावर आरूढ होण्यास सक्षम आहात, पण जर तुमचे बोधिचित्त नष्ट झाले तर तेव्हा मात्र तुम्ही ह्या मार्गावरून भ्रष्ट झालेले आहात. बोधिचित्त म्हणजे - सर्व जगाच्या कल्याणाकरिता मी बुद्धत्वाची प्राप्ती करेन, अशा प्रकारची अकृत्रिम अभिलाषा जेव्हा एखाद्या सामान्य चित्तामध्ये निर्माण होते, त्यां चित्ताला बोधिचित्त असे म्हणतात.


३. असाच काहीसा प्रकार आपल्याला भगवान बुद्धांच्या मुल पारंपारिक धर्माच्या बाबतीत होणारा अपप्रचार होतांना बघायला मिळतो, त्यामध्ये विपश्यनेसह, मूळ पाली तीपिटक ग्रंत हे संपूर्ण ब्राह्मणांनी केलेली भेसळ आहे, या निष्कर्षा पर्यंत येऊन पोहोचतात, अर्थात मग त्यांना स्वीकारण्याचा कोणता प्रश्नच येत नाही. याचा कदाची असाही अर्थ होऊ शकतो कि, मग बुद्धांची शिकवण सुध्दा अस्तित्वातच नाही, जे काही आहे ते ब्राह्मणांनी भेसळ केलेले. मग आधुनिक विश्वातील इतक्या विद्वानांनी बुद्धांना आणि त्यांच्या धर्माला जाणले ते त्यां भेसळयुक्त ग्रंथांना वाचूनच का.? कोणतीही गोष्ट जी आपल्या बुद्धीला पटली नाही, ती भेसळयुक्तच असली पाहिजे असा आजच्या तथा कथित उपासकांचा गैरसमज झालेला आहे, ते त्यां गोष्टीला भगवान बुद्धांच्या धर्माच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करीत नाहीत.


४. याच कंपनीतील विद्वान मंडळी सुध्दा विपश्यना हि बुद्धांची मूळ शिकवण म्हणून स्वीकार करायला तयारच नाहीत, त्यांना ग्रंथांचे दाखले दिले असता, ते सर्व भेसळ आहे म्हणून नाकारतात, तर काही लोक सर्व ग्रंथानाच नाकारून, ऐतिहासिक बुद्धांना नाकारून आपल्याच मनातील कथित कुऱ्हाड घेऊन चालणारा बुध्द प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी किंबहुना त्यांना बुध्दावा आणि बुद्धत्वाचा अर्थ सुध्दा नीट कळलेला नसतो. त्यांच्या अर्थानुसार डोळे बंद करून बोधिवृक्षाखाली बसलेला बुध्द हा ब्राह्मणनिर्मित असून, खरा बुध्द उघड्या डोळ्यानी कुऱ्हाड घेऊन जुलमी व्यवस्थे विरुध्द लढणारा आहे. पण बुद्धांनी  सांगितले आहे, "युध्दामध्ये सहस्त्र लोकांना जिंकण्यापेक्षा जो एक स्वतःला जिंकतो, तो खरं विजेता होय." अर्थात क्रोधाने, द्वेषाने, किंवा अनेक इतर कामनांनी इतरांना मारझोड करून आपण त्याच्यावर विजय प्राप्त करतो, अशा हजारो लोकांवर जरी आपण विजय प्राप्त केला तरी सुध्दा स्वतःवर - स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करणाऱ्याशी आपण कणभर सुध्दा बरोबरी करू शकत नाही. तुलनेत बाह्य युध्दामध्ये इतरांना मारझोड करून विजय प्राप्त करणे जास्त कठीण नाही, जेवढे स्वतःवर विजय प्राप्त करणे कठीण आहे. कारण येथे तुम्हाला तुमच्या स्वतःशीच युध्द करायचे असते, तुमच्याच मनातील वाईट विचारांना नष्ट करून, तुमच्या चित्ताची शुद्धी करून निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग हा बुध्दांनी सांगितलेला आहे. धम्म्पालन गाथा सुध्दा आपल्याला हेच सांगते, "कोणत्याही प्रकारचे पाप न करणे, कुशल धर्मांचे संपादन करणे, स्वःचित्ताची शुद्धी करणे, हेच बुद्धांचे शासन आहे." अशा चित्ताची शुद्धी करण्यासाठीच भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीचा अभ्यास करायला सांगितले आहे. विपश्यना हे सुध्दा सम्यक समाधीचे अंग आहे, जे भटकणाऱ्या चित्ताला एकाग्र करून योग्य वळणावर लावते. त्यामुळे केवळ आह्य गोष्टींचा विचार करून, त्या गोष्टींना एकांगी दृष्टीकोनातून पाहून आपल्या अज्ञानापोटी केवळ विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा त्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा असे वाटते.



५. बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बौध्द धर्माला मूळ पारंपारिक बौद्ध धर्मापासून वेगळे ठरविण्यासाठी केवळ महायान किंवा विपश्यना हे दोनच विषय नाहीत, इतरही अनेक आहेत, जसे जातक सिद्धांत वगैरे.. आपला विरोध दर्शविण्यासाठी आणि त्यां अनुषंगाने अपप्रचार करण्यासाठी हे लोक वेळ, काळ आणि परिस्थितीला समजून न घेता बाबासाहेबांनी म्हटलेल्या काही वाक्यांचे संदर्भ देत असतात, आणि त्यांना ह्या गोष्टी मुळी मान्यच नव्हत्या हे जाहीर करतात. काही प्रसंगामध्ये तर कोणत्याही प्रकारचा संदर्भ नसतांना सुध्दा ते याप्रमाणे प्रचार करतांना दिसतात _ जसे जातक कथा या ब्राह्मणांनी भेसळ केलेल्या आहेत, त्या खोट्या असून बाबासाहेबांनी नाकारल्या आहेत आणि आतां आपली जवाबदारी आहे कि, आपान सर्वांनी त्या नाकारल्या पाहिजेत. पण वास्तवात बाबासाहेबच जातक सिद्धांतांची स्तुती करतात किंबहुना ते तर जातक सिद्धांताला भगवान बुद्धांच्या जीवनाच्या जडणघडणी मधली सर्वश्रेष्ठ संकल्पना म्हणून स्वीकार करतात, ज्यावरच संपूर्ण महायान आधारित आहे, त्याला बाबासाहेबांनी कशाप्रकारे नाकारले असावे..? बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये कित्येक लेख त्यांनी महायांनी ग्रंथांच्या आधारावर लिहिले आहेत, विपश्यना आणि ध्यान हे बुद्धांच्या शिकवणीचे आणि मार्गाचे अंग आहेत हे त्यांनी आपल्या ग्रंठातीले कित्येक लेखांमधून सांगितले आहे, आपण एखाद्या गोष्टींचा विरोध करीत असतांना एकांगी अभ्यासावर न करता, इतर सर्व गोष्टींचा विचार सुध्दा करायला पाहिजे असे मला वाटते. अन्यथा बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुध्द हा मुल पारंपारिक बुध्दापेक्षा वेगळा आहे, असे आपल्या अज्ञानामुळे अपप्रचार करीत राहिलो तर आपण तेच करत आहोत, जे शेकडो वर्षांपासून भगवानांच्या बाबतीत अपप्रचार करीत आले आहेत कि, ते विष्णूचे अवतार होते. शिवाय यां काळातही बाबासाहेबांनी बुद्धांना स्वीकारले नसून, त्यांनी स्वतःचा वेगळा इचार एका नव्या बुध्दाची निर्मिती करून त्यांच्याद्वारे मांडला, असा प्रचार सुध्दा आपल्याला त्यांच्याद्वारे होतांना दिसत आहे. म्हणून सर्व गोष्टींचा विचार करून, धर्माचा स्वतः अनुभव करून, त्यातील सत्यता पडताळून पाहून त्या सर्वांचे हे प्रयत्न आपण हाणून पाडायला हवेत.


                                                                                - पियुष खोब्रागडे