बुधवार, १९ जुलै, २०१७

बुध्द शासनाला भ्रष्ट करण्याचे प्रयत्न

सदर लेख आमचे मार्गदर्शक मित्र विशाल वज्र यांनी लिहिलेला आहे, कृपया आपण सर्वांनी त्याला मनपूर्वक वाचून त्यावर विचार करावा....



आज वृत्तपत्रात एक बातमी वाचली, जी बहुदा जाहिरात या सदराखाली मोडावी या प्रकारची होती, बौद्ध मताला कशाप्रकारे भ्रष्ट केल्या जाते आहे याचा एक उत्तम नमुना म्हणजे ती बातमी वजा जाहिरात. त्याच मानसिकतेचे खंडण करण्यासाठी हे लिखाण.







नंद हा बुद्धांचा लहान चुलत भाऊ होता. जरी भगवंताच्या उपाय कौशल्याने तो संघात प्रव्रजित झाला तरी कामभोगांच्या आत्यंतिक तृष्णे मुळे तो शीलांचे पालन करू शकत नव्हता. 

त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी भगवान बुद्ध आपले उपाय कौशल्य वापरतात. एकदा बुध्द नंदाला हिमालयातील एक एका डोळ्यानी आंधळी माकडीन दाखवितात आणि विचारतात, "नंद, ही माकडीन तुझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या तुलनेत दिसायला कशी आहे?"  नंद त्वरित उत्तर देतो, "माझी पत्नी पुंडरिका हिच्या पेक्षा शेकडो हजारो पटीने अधिक सुंदर आहे."


मग भगवंत त्याला देवलोकात घेऊन जातात आणि ते आपल्या आसनावर बसून नंदाला स्वर्गाचा फेरफटका मारायला सांगतात. फिरता फिरता नंद एका जागी थांबतो आणि पाहतो की एक सुंदर रिकामे आसन आहे आणि अनेक अतीव सुंदर अप्सरा त्या आसनाच्या सभोवताली बसून कुणाची तरी वाट पहात आहेत. नंद त्यांना विचारतो, की हे आसन कुणाचे आहे आणि त्या कुणाची वाट पाहत आहेत. तर अप्सरा त्याला सांगतात, की बुद्धांचा एक नंद नावाचा लहान चुलत भाऊ आहे जो की शीलांचे पालन करून मृत्यू नंतर येथे जन्म घेणार आहे, त्याचेच हे आसन आहे आणि आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. हे ऐकून नंद खूप हर्षित होतो. तेवढ्यात बुद्ध तेथे जाऊन त्याला विचारतात, नंद या अप्सरा आणि तुझी पत्नी या दोन्ही पैकी कोण जास्त सुंदर आहे? नंद लगेच सांगतो, पुंडरिका या अप्सरांपुढे काहीच नाही, या अप्सरा तिच्या पेक्षा शेकडा हजारो पटीने सुंदर आहेत. अतिशय आनंदाने नंद भगवंतासोबत विहारात परत येतो आणि मनापासून विनय आणि शीलांचे पालन करावयास लागतो.



काही दिवसांनी भगवान सर्व भिक्षूंची बैठक बोलावतात आणि सांगतात, की भिक्षूंनो तुम्ही सर्व संसारापासून सुटकेसाठी आणि दुःख मुक्ती साठी येथे साधना आणि विनय, शील पालन करता पण नंद मात्र स्वर्गलोकाच्या प्राप्तीसाठी विनय पालन करतो आहे. त्यामुळे तुमचा आणि नंदाचा मार्ग पूर्णतः वेगळा आहे. म्हणून यापुढे तुम्ही नंदाशी संपर्क ठेवता कामा नये, त्याच्याशी कुणी काहीच बोलू नये, इतकेच काय तर त्याच्या शेजारी एका आसनावर देखील कुणी बसू नये. त्यावेळेपासून सर्व भिक्षु तथागतांच्या आदेशाचे पालन करावयास लागले आणि नंद अगदी एकटा पडला. एक दिवस आनंद आपल्या आसनावर बसून होता, नंदाने त्याला पाहिले व विचार केला की आनंद माझा मोठा भाऊ आहे त्याच्या मनात नक्कीच माझ्या बद्दल प्रेम असेल. असा विचार करून तो आनंदकडे गेला पण आनंद देखील तिथून निघून जायला लागला, नंदाने त्याला विचारले की सगळे माझ्याशी असे का वागत आहेत. त्यावेळी आनंदाने त्याला बुद्धांच्या आदेशा विषयी सांगितले. ते ऐकून नंद खूपच कष्टी झाला.


असाच काही काळ लोटला, आणि भगवंत परत नंदाकडे आले आणि त्याला म्हणाले की चल आपण नरक लोकाला भेट देऊ. तिथे गेल्यावर भगवंतांनी नंदाला परत एक फेरफटका मारायला सांगितला. फिरत असताना नंदाने नरकलोकाचे ते भीषण दृष्य पाहिले, एके ठिकाणी त्याने अग्नीने वेढलेले एक मोठे भांडे पाहिले, तो प्रचंड अग्नी त्या भांड्यात देखील प्रवेश करू पाहत होता. आणि अनेक यमदूत कुणाची तरी वाट पाहात तेथे थांबले होते. नंदाने त्यांना विचारले की हे भांडे रिकामे का आहे आणि ते कुणाची वाट पाहात आहेत. तेव्हा एक यमदूत म्हणाला, नंद नावाचा बुद्धांचा लहान चुलत भाऊ आहे, जो स्वर्गलोकाच्या प्राप्तीसाठी विनय आणि शील पालन करतो आहे, जेव्हा त्याचे स्वर्गलोकातील आनंद उपभोगून पुण्य समाप्त होईल त्यावेळी तो इथे जन्म घेणार आहे आणि आम्ही त्याचीच वाट पाहात आहोत, त्याला या भांड्यात घालावयाचे आहे.


हे सगळे ऐकून भयग्रस्त झालेला नंद परत येऊन विचार करतो की भविष्यात देवलोकात जन्म घेऊन शेवटी नरकात जाऊन पडणे काही सुज्ञ पणाचे नाही. त्या नंतर नंदाने आपले क्षुद्र स्वर्गप्राप्तीचे ध्येय बाजूला सारून, संसारातून मुक्तीचे खरे ध्येय धारण केले. आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी नरक पाहून, तेथून पुढे त्याने कधीही आपल्या विनयाचा भंग केला नाही, आणि बुध्दांनी त्याला इंद्रियांवर नियंत्रण असलेला सर्वोत्तम शिष्य अशी उपमा दिली.


या लेखन प्रपंचाचा हेतू असा की आजकाल अनेक लोक विपश्यना आणि तत्सम बौद्ध ध्यान पद्धतींचा उपयोग मनाची एकाग्रता वाढविणे, शांतता वाढविणे, तथाकथित रोग मुक्ती , गर्भ संस्कार इत्यादींसारख्या क्षुल्लक सांसारिक गोष्टीसाठी करत आहेत आणि या सर्व क्षुल्लक गोष्टींमध्ये विपश्यनेचे चे अंतिम ध्येय, म्हणजे निर्वाण प्राप्ती आणि संसारापासून मुक्ती, ते कुठेतरी हरवले जात आहे. तसेच महाराष्ट्रात आज ज्या काही संस्था विपश्यनेचा प्रचार करीत आहेत त्यादेखील वर उल्लेख केलेल्या क्षुद्र गोष्टींच्या नावाखालीच लोकांना आपल्या कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात असे प्रकर्षाने जाणवते.


याचा अर्थ असा नाही की मनाची एकाग्रता वाढविणे, शांतता वाढविणे चुकीचे आहे, ह्या गोष्टी म्हणजे विपश्यनेचे अतिरिक्त फायदे म्हटले जाऊ शकतात, बोनस म्हटले जाऊ शकतात पण अंतिम ध्येय मुळीच नाही. आणि जर कुणी वर उल्लेख केलेल्या क्षुद्र गोष्टींना ध्येय ठरवून विपश्यनेचा अभ्यास करत असेल तर तो बुद्धांचा मार्ग अजिबात नाही. भगवंताच्या धम्माचा दुरुपयोग मात्र नक्कीच आहे.


वरील कथेमधील भगवंताचे शब्द आपण लक्षात घेतले पाहिजेत, भगवान स्पष्ट शब्दांत सांगतात की सांसारिक सुखांच्या प्राप्तीसाठी जर कुणी धम्म पालन करत आहे तर तो बुद्धांचा मार्ग नाही. हा प्रकार म्हणजे जणू भगवंताच्या लोकोत्तर धम्माला लोकधम्मांच्या सेवेत रुजू करण्यासारखे आहे. तसेच या प्रकाराला बुद्ध शिक्षा देखील सुनावतात. या वरून आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.


आपण कितीही उच्च प्रतीची बौद्ध साधना विपश्यना, महामुद्रा, महासंधी इत्यादी करत असू पण जर आपली ती करण्यामागची भावना/intension जर बुद्धांच्या उपदेशास अनुसरून नसेल तर ती सांसारिक साधनाच ठरेल, लोकोत्तर होणार नाही. 

याच कारणामुळे बौद्ध साधनांमध्ये विशेषतः महायानाच्या ज्या साधना पद्धती आहेत त्यात अगदी सुरवातीलाच आपण आपले साधना करण्याचे उद्दिष्ट, प्रयोजन काय आहे ते स्पष्ट करतो जेणेकरून आपण आपल्या धेय्याप्रति जागृत राहू. 

जोपर्यंत आपण अनित्य, दुःख आणि अनात्म या संसाराच्या त्रिलक्षणांविषयी सचेत होऊन, आपला अभ्यास या लक्षणांच्या मर्यादेत राहून करणार नाही, तो पर्यंत आपल्याला या बौद्ध साधनांचे गांभीर्य कळणार नाही. 

बुद्ध म्हणतात, "दुःख हा या संसाराचा स्वभाव आहे."आणि त्या दुःखापासून मुक्ती आपले ध्येय आहे हे आपण कधीही विसरता कामा नये, तरच आपल्या साधनेला, अभ्यासाला काही अर्थ उरतो.


~ विशालवज्र                    


।।सर्वमंगलम्।।

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


टीपणे:-


१. वरील लेखातील कथा ही धम्मपदातही येते. मी ही कथा, Words of my perfect teacher ही ग्रंथातून भाषांतरित केली आहे.

२. महामुद्रा, महासंधी या महायान/वज्रयानातील अंतिम सत्य, निर्वाण जाणण्याच्या साधना पद्धती आहेत. या अत्यंत सूक्ष्म पातळीवरील विपश्यनाभावना आहेत, यांनाच महा विपश्यना असे देखील म्हणतात.

३. लाभ हानि ,
यश अपयश ,
सुख दुःख ,
जय पराजय
यांना आठ लोकधम्म म्हणतात. यांच्या प्राप्तीसाठी बुद्धांच्या शिकवणीचा उपयोग केला जाऊ शकत नाही आणि केला तर तो बुद्धांचा धम्म ठरत नाही.