गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

त्रिशरण / शरणगमन / Refuge

    

शरणगमन/Refuge किंवा त्रिशरण हे सर्व बौद्ध पद्धतींचे, परंपरांचे मूळ आणि प्रवेशद्वार आहे. सर्व भिक्षु प्रातिमोक्ष, उपासकांच्या तसेच बोधिसत्वांच्या प्रतिज्ञांचा पाया आहे आणि हेच बौद्ध आणि अबौद्ध लोकांमध्ये फरक करण्याचे  चिन्ह देखील आहे, जे त्रिरत्नांना शरण जात नाहीत त्यांना बौद्ध म्हणता येत नाही.

शरणगमन म्हणजे काय, त्यामागील भावना काय आहे, शरणगमनाच्या किती पद्धती आहेत, या विषयी आपण थोडक्यात पाहू.

त्रिशरण/शरणगमन

बुद्धं सरणं गच्छामि।
धम्मं सरणं गच्छामि ।
सङ्घं सरणं गच्छामि।

दुतीयम्पि बुद्धं सरणं गच्छामि।
दुतीयम्पि धम्मं सरणं गच्छामि ।
दुतीयम्पि सङ्घं सरणं गच्छामि।

ततीयम्पि बुद्धं सरणं गच्छामि।
ततीयम्पि धम्मं सरणं गच्छामि ।
ततीयम्पि सङ्घं सरणं गच्छामि।

मी बुद्धाला शरण जातो.
मी धम्मा शरण जातो
मी संघाला शरण जातो.

दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.
दुसऱ्यांदा मी धम्मा शरण जातो
दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.

तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.
तिसऱ्यांदा मी धम्मा शरण जातो
तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.

अश्या प्रकारे वरील ओळींना प्रत्येकी तीनदा उच्चारून आपण बुद्ध, धर्म आणि संघाला शरण जातो.

आपण त्रिरत्नांना शरण का जातो आणि त्यामागील आपली भावना काय आहे हे खूप महत्वाचे आहे. त्यावरून आपले ध्येय काय हे लक्षात येते.

सामान्य लोक ज्यावेळी अनित्य, अनात्म आणि दुःख अश्या संसाराबाबत ऐकतात त्यावेळी त्या संसाराच्या भीतीतून ते त्रिरत्नांना शरण जातात.
बुद्धांच्या धर्म पालनाने आपली संसारापासून रक्षा व्हावी, अशी त्यामागील भावना असते.
त्रिशरण घेण्याची ही अगदी मूलभूत भावना असते.
या भावनेतून जे लोक त्रिरत्नांना शरण जातात ते तथागतांचा धर्म अभ्यास व पालन करून 'अर्हत', 'प्रत्येकबुद्ध' या महान पदांना त्यांच्या प्रयत्नांतून प्राप्त करू शकतात. किंवा कमीतकमी ते पुढील जन्मांच्या अवस्थांमध्ये 'सुगती' प्राप्त करतात अथवा सर्व सुख सुविधानीं युक्त, सुंदर असा मनुष्य देह धारण करू शकतात.

ही त्रिशरणांना शरण जाण्याची अगदी प्राथमिक पद्धत आहे, जी सर्व बौद्ध संप्रदाय व परंपरांना लागू आहे. पण या व्यतिरिक्त शरण ग्रहण करण्याची दुसरीही एक पद्धत आहे, त्याविषयी पुढील लेखात, तो पर्यंत आपण यावर चिंतन करून बुद्ध, धर्म आणि संघाला खरोखर अगदी मनापासून आपले शरणस्थान म्हणून पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला काही प्रश्न असल्यास कंमेन्ट  मध्ये आपण विचारू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा