रविवार, १० सप्टेंबर, २०१७

बोधिसत्व आदर्श

सदर लेख आमचे मार्गदर्शक मित्र, विशालवज्र यांनी लिहिलेला आहे. ह्या धर्मामृताचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा...




भगवान बुद्ध ज्यावेळी आपला उपदेश देतात त्यावेळी तो उपदेश ते त्या जीवसत्वाच्या क्षमतेनुसार देतात. कुणीही ज्यावेळी बुद्धांकडे जातो त्यावेळी बुद्ध त्यांच्या दृष्टीने त्या जीवसत्वाचे अवलोकन करतात, त्याचे कर्म व पुण्य तपासतात व त्यानुसारच त्याला योग्य, समजण्याजोगी, तो त्या शिकवणीचा अभ्यास करून त्याचे फळ प्राप्त करू शकेल अशी शिकवण देतात. 


म्हणूनच बुद्धांच्या शिकवणीत आपल्याला अर्हतांसाठी, प्रत्येकबुद्ध व बोधिसत्वांसाठी अश्या सगळ्यांसाठी दिलेली शिकवण आढळते. आणि याच शिकवणींचे पालन करून त्याचे शिष्य काही अर्हत बनून जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन स्वतः साठी निर्वाण साधतात, तर काही येणाऱ्या जन्मांमध्ये प्रत्येकबुद्ध बनण्याचे पुण्य अर्जित करतात. आणि काही या दोघांपेक्षा वेगळे असे सर्वोच्च ध्येय केवळ स्वतः साठी नाही तर या विश्वातील प्रत्येक जीवसत्वासाठी तुमच्या आमच्यासाठी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी झटत असतात, त्याच जीवांना बोधिसत्व महासत्व असे संबोधले जाते, ते केवळ बुद्धांचे शिष्य नसून त्याचे पुत्र व पुत्री म्हणून संबोधले जातात.




करुणा हा बोधिसत्वांचा सर्वोच्च गुण आहे, त्या करुणेमुळेच ते सर्व सत्वांच्या हितासाठी बुद्ध बनण्याचा संकल्प करू शकतात. त्या करुणेमुळेच ते कल्प कल्पांचा हा बुद्ध बनण्याचा हा कठीण प्रवास करतात.
ते सदैव असाच विचार करतात की माझ्या आजूबाजूला कितीतरी जीवसत्व दुःखाने पीडित आहेत, ते दुःखी असताना मी सुखी कसा असू शकतो, मी एकटाच निर्वाण कसे काय प्राप्त करू आणि बोधिसत्वांचा हाच विचार त्यांना बुद्धत्व प्राप्तीच्या ध्येयाकडे घेऊन जातो. आणि ते खरोखरच बुद्धत्व प्राप्त करून अगणित सत्त्वांचे हित साधतात व त्यांनादेखील बुद्धत्वाच्या मार्गात आणतात.


म्हणून बोधिसत्व आदर्शाला सर्वोत्तम म्हटले गेले आहे कारण ते सर्वांना बुद्धत्वाकडे जातात. या मार्गावर चालताना त्यांना अनेक वेगवेगळ्या अवस्थांतून जावे लागते, जसे की सहा अथवा दहा पारमिता, पंच मार्ग, दहा भूमी इत्यादी. तसेच ते बोधिसत्वांच्या अठरा प्रतिज्ञा देखील करतात. (या विषयांवर अधिक खोलात वेळोवेळी येथे लिहिण्यात येईलच.)




बोधिसत्व अगदी कुठल्याही रुपात असू शकतात त्यांना स्त्री, पुरुष, मानव, प्राणी असा कुठलाही भेद नाही. ज्या ज्या ठिकानातून त्यांना इतरांना मदत करता येईल त्या त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. ते अगदी सामान्य दिसणाऱ्या माणसाप्रमाणे राहू व वागू शकतात किंवा अतिशय असामान्य पण असू शकतात. आपल्यात देखील असे अनेक बोधिसत्व असू शकतात. अतिशय महान असा हा बोधिसत्व आदर्श सर्वांनी अंगीकार करण्यासारखा आहे. त्यामुळेच बोधिसत्व जेव्हा त्रिशरण ग्रहण करतात, तेव्हा त्यांची भावना सामान्य लोकांपेक्षा अगदी वेगळी असते, ती कशी ते आपण पाहू.


खाली बोधिसत्वांची शरणगमन गाथा व तिचा अर्थ दिला आहे.

बोधिसत्वांची शरणगमन आणि बोधिचित्त गाथा
🌻"बुद्धं च धर्मञ्च गणोत्तमं च यावद्धि बोधिं शरणं गतोऽस्मि।

दानादिकृत्यैश्च कृतैर्मयैभिः बुद्धो भवेयं जगतो हिताय"॥

अर्थ:-
🌻"बुद्ध, धर्म आणि संघाला मी स्वतः बोधी प्राप्त करे पर्यंत शरण जातो/जाते.

दान आदी सहा पारमितांची पूर्तता करून,
संपूर्ण जगताच्या हितासाठी, मी बुद्ध व्हावे."


🌻Until I am enlightened,

I go for refuge to the Buddha, Dharma and Sangha.
Through the virtue I create by practising giving and the other perfections,
may I become a Buddha to benefit all sentient beings.


🌻जब तक मैं बोधी प्राप्त न कर लु, तब तक मैं बुद्ध धर्म और संघ कि शरण ग्रहन करता हूं।

दान आदी (छह) पारमिताओकी पूर्तता करके, संपूर्ण जगत(सभी सत्वो) के हित के लिये, मैं खुद बुद्ध बनू।


वरील शरणगमनाला तीनदा उच्चारून बोधिसत्व त्रिरत्नांना शरण जातो.

ही बोधिसत्वांची शरणगमन प्रार्थना आहे, जे शरणगमन आपण मागील पोस्ट मध्ये पाहिले त्यापेक्षा थोडे वेगळे आहे कारण ह्या शरणगमनाची भावना वेगळी आहे.  जसे की आपण मागील पोस्ट वाचले की जेव्हा सामान्य लोक त्रिरत्नांना शरण जातात, तेव्हा ते केवळ या एकाच जन्मासाठी, संसाराच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी त्रिरत्नांना शरण जातात. पण बोधिसत्व हे जन्मजन्मांतरासाठी त्रिरत्नांना शरण जातात, जो पर्यंत ते स्वतः बुद्धत्व प्राप्त करत नाहीत, बुद्ध बनत नाहीत, त्या सम्यक संबोधीच्या अंतिम क्षणापर्यंत बोधिसत्व त्रिरत्नांना शरण जातात.


तसेच बोधिसत्वांच्या शरणगमनात बोधिचित्ताची भावना असते. आता "बोधिचित्त" म्हणजे काय, तर सर्व सत्वांच्या हितासाठी स्वतः "बुद्ध बनण्याची तीव्र इच्छा" म्हणजे बोधिचित्त.  आणि त्या इच्छेनुसार बोधिसत्व त्यांच्या असिम करुणेमुळे जन्मजन्मांतराचा अतिशय कठीण प्रवास करून आपल्या हितासाठी बुद्ध बनतात. त्यांच्या त्या महा करुणेमुळे ते निर्वाणाचा देखील त्याग करतात.(याचा अर्थ असा नाही की ते निर्वाण प्राप्त करत नाहीत, त्यांच्या साधनेतून त्यांना आधीच निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असतो पण तरीही ते परिनिर्वाण न पावता जीवसत्वांना मदत करण्यासाठी बोधिसत्व अवस्थेतच राहतात.)


बोधिसत्वांच्या या प्रवासाबाबत आपण "जातक कथांमध्ये" वाचतोच, ज्या की स्वतः बुध्दांनी कथन केल्या आहेत.
(ही बोधिचित्ताची अगदी थोडक्यात आणि सोपी व्याख्या आहे वास्तविक पाहता "बोधिचित्त" हा खूप खोल आणि गहन विषय आहे, ज्यावर अनेक महान विद्वानांनी पुरातन काळापासून लेखन आहे.)

म्हणूनच बोधिसत्वांच्या या महान संकल्पाला आणि शरणगमनाला विशेष म्हटले आहे.


बोधिसत्व कोण बनू शकतो/शकते? तर कुणीही स्त्री अथवा पुरुष, अगदी तुम्ही आणि मी सुद्धा बोधिसत्व बनू शकतो. कारण बुध्दांनी स्वतः कथन केले आहे की कुणीही बुद्धत्व प्राप्त करू शकतो. स्वतः बुद्ध एका सामान्य माणसातूनच बुद्ध बनले आहेत.


बोधिसत्त्वाला बुद्धत्वाचा गर्भ म्हटल्या गेले आहे ज्यातून बुद्धत्व जन्मास येतं. ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीच्या मनात बोधिचित्ताचा उदय होतो अगदी त्याच क्षणी ती व्यक्ती बोधिसत्व या नावाने संबोधल्या जाते. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनात बोधिचित्ताला जागृत केले पाहिजे असे सूत्र म्हणतात, या मागील उद्देश असा की ज्या वेळी बोधिसत्व असतील तेव्हाच बुद्ध सुद्धा उत्पन्न होतात, जर बोधिसत्वच नसतील तर बुद्ध कसे काय अस्तित्वात येतील?

त्यामुळेच यालाच अनुसरून शांतीदेव कामना व्यक्त करतात की,


"जिथे "बोधिचित्त" उत्पन्न झाले नाही तिथे ते उत्पन्न होवो;
आणि जिथे "बोधिचित्त" उत्पन्न झाले आहे तिथे त्याचे सदैव वर्धन होवो, वाढत जावो."

~ बोधिचर्यावतार

शेवटी मी सुद्धा कामना करतो की हे त्रिसहस्त्र लोकधातूंचे विश्व सदैव बोधिसत्वांनी परिपूर्ण राहो. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात या बोधिसत्व आदर्शाला अंगीकारावे. 


नेहेमीप्रमाणे आपल्या प्रश्नांचे, सूचनांचे सदैव स्वागत आहे.

-  विशाल वज्र     

 



।। सर्वमंगलम्।।

हे सुध्दा वाचा : 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा